मस्तच! आता कर्ज घेणे होणार स्वस्त, ‘या’ 4 प्रमुख बँकांनी व्याजदरात केली मोठी कपात

Banks Slash Lending Rates | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही दिवसांपूर्वीच रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर आता 6.25% वरून 6% केला असून, त्याचा थेट फायदा आता सामान्य ग्राहकांना होऊ लागला आहे.
आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर आता चार सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांनी त्यांच्या कर्जदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आता गृहकर्ज व वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
बँकांच्या निर्णयामुळे नागरिकांना कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध होईल. कर्जदरात कपात करण्याचा निर्णय कोणत्या बँकांनी घेतला आहे, त्याविषयी जाणून घेऊया.
1. पंजाब नॅशनल बँक (PNB)
पीएनबीने 10 एप्रिल 2025 पासून आपल्या रेपो-लिंक्ड कर्ज दरात (RLLR) कपात केली आहे. आता हा दर 9.10% वरून 8.85% झाला आहे. मात्र, MCLR आणि बेस रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
2. इंडियन बँक
इंडियन बँकेने 11 एप्रिलपासून RLLR दर 9.05% वरून 8.70% केला आहे. हे दर सर्व प्रकारच्या रेपो-लिंक्ड कर्जांवर लागू होणार आहेत.
3. बँक ऑफ इंडिया
या बँकेने देखील 9 एप्रिलपासून आपला RBLR 9.10% वरून 8.85% केला आहे
4. बँक ऑफ बडोदा (BOB)
BOB ने एक वर्षाचा MCLR दर 9% पर्यंत कमी केला असून, ओव्हरनाईट MCLR आता 8.15% वर आला आहे. त्यामुळे विविध कालावधीच्या कर्जांवरील व्याजदर कमी होणार आहेत.
या बँकांच्या निर्णयामुळे नवीन गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी कर्ज स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर ज्यांचे कर्ज रेपो दराशी जोडलेले आहे, त्यांच्यावरही या बदलाचा सकारात्मक परिणाम होणार आहे.



