South Korea : दक्षिण कोरियात आणिबाणी; देशभरात मार्शल लॉ लागू

सेऊल,(दक्षिण कोरिया) : दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल यांनी देशात आणिबाणी जाहीर केली असून देशभरात मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. विरोधकांकडून सरकारविरोधी कारवाया केल्या जात असून या कारवायांमुळे देशाच्या लोकशाही व्यवस्थेलाच धोका निर्माण झाला असल्याचा आरोप करून येओल यांनी हे पाऊल उचलले आहे.
सरकारी वृत्तवाहिनीवरून केलेल्या निवेदनामध्ये देशभरात आणिबाणी लागू झाल्याची घोषणा त्यांनी केली. अचानक करण्यात आलेल्या या घोषणेमुळे देशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तर कोरियाशी जवळीक असलेल्या विरोधकांकडून संसदेचे नियंत्रण घेतले गेले असून यामुळे प्रशासनाचे अवमूल्यन होते आहे आणि आपल्या प्रशासनाला कमकुवत केले जात असल्याचे येओल यांनी म्हटले आहे. देशात असलेल्या उत्तर कोरिया धार्जिण्या शक्तींना संपवण्याचा आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
तात्काळलागू झालेल्या मार्शल लॉ चा लोकशाही आणि प्रशासनावर कसा परिणाम होईल, हे मात्र स्पष्ट समजू शकलेले नाही. यून सूक येओल यांनी २०२२ मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तेंव्हापासूनच त्यांना सत्तासंघर्ष करावा लागत होता. त्यांच्या कन्झर्वेटिव्ह पीपल्स पॉवर पार्टीला विरोधी डेमोक्रॅटिक पक्षामुळे अनेक महत्वाच्या विधेयकांबाबत
संसदेतल्या कोंडीला सामोरे जावे लागले होते. पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत देखील संसदेत कोंडी झाली होती. यामुळे येओल यांची लोकप्रियता घसरू लागली होती. त्यातच काही वादांमुळे देखील सरकार अडचणीत आले होते. येओल यांच्या पत्नी आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंधित घोटाळ्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून लावून धरली गेली होती. आणिबाणीची घोषणा झाल्यावर डेमोक्रॅटिक पक्षाने आपल्या पक्षाची तातडीची बैठक बोलावली आहे. मात्र मार्शल लॉ बाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.





