अमेरिका ‘या’ सर्वात शक्तिशाली लष्करी संघटनेतून बाहेर पडणार? युरोपचे कारण देत इलॉन मस्क म्हणाले…

Elon Musk | डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून तडकाफडकी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. टॅरिफपासून ते युक्रेनबाबत ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली आहे. आता अमेरिका नाटो या लष्करी संघटनेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण ठरले आहे. ट्रम्प यांचे निकटवर्तीय इलॉन मस्क. अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अमेरिकेने नाटोमधून बाहेर पडावे असे म्हटले आहे.
सध्या मस्क यांच्याकडे डिपार्टमेंट ऑफ गर्व्हमेंट इफिशियन्सीची (DOGE) जबाबदारी आहे. या विभागाकडून सरकारच्या आर्थिक व्यवहारांसदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे. त्यातच आता मस्क यांनी ट्विट करत अमेरिकेने नाटोमधून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
We really should.
Doesn’t make sense for America to pay for the defense of Europe. https://t.co/jXs6yNA8Re
— Elon Musk (@elonmusk) March 9, 2025
एका ट्विटला उत्तर देत मस्क म्हणाले की, ‘अमेरिकेने खरोखरच बाहेर पडायला हवे. युरोपच्या संरक्षणासाठी अमेरिकेने पैसे देणे योग्य नाही.’ मस्क यांच्या ट्विटनंतर आता अमेरिका खरचं या लष्करी संघटनेतून बाहेर पडणार का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात झालेली बैठक वादग्रस्त ठरली होती. ट्रम्प यांनी युक्रेन-रशिया युद्धाबाबत कठोर भूमिका घेतली आहे. एकीकडे युरोपियन राष्ट्र युक्रेनच्या बाजूने उभे असताना, अमेरिका विरोधात भूमिका घेताना दिसत आहे. त्यामुळे अमेरिका नाटोमधून बाहेर पडल्यास यूरोपियन देशांसाठी हा मोठा धक्का असू शकतो.
नाटो संघटना काय आहे?
नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) ही युरोपियन देशांची एक लष्करी संघटना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या संघटनेची स्थापना झाली होती. या संघटनेत यूरोपमधील बहुतांश देश सहभागी आहेत. अमेरिकेसह 30 पेक्षा अधिक देशांचा या संघटनेत समावेश आहे.
नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे. नाटोच्या नियमानुसार, कोणत्याही एका सदस्य देशावर सशस्त्र हल्ला झाल्यास इतर देश त्यांच्या मदतीला येतील. त्यामुळे युक्रेन देखील या संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे.





