Elon Musk | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’(DOGE) या विभागाची जबाबदारी अब्जाधीश इलॉन मस्क यांच्याकडे सोपवली आहे. या विभागाचा मूळ उद्देश संघीय खर्चात कपात करणे हा आहे. आता मस्क यांनी अर्थसंकल्पाबाबत असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.
अमेरिकेने आपल्या अर्थसंकल्पात कपात केली नाही तर देश दिवाळखोरीत जाऊ शकतो, असा इशारा मस्क यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्यासोबत व्हाइट हाउसमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा मांडला.
मागील आर्थिक वर्षात अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट तब्बल 1.8 ट्रिलियन डॉलर एवढी होती. या तुटीवरुन मस्क यांनी चिंता व्यक्ती केली आहे. तसेच, देशाच्या खर्चात कपात करणे हा आता पर्याय राहिलेला नसून, तर ती एक अनिवार्यता बनली आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी मागील काही आठवड्यात सरकारी खर्च कमी करण्याच्या उद्देशाने अनेक कार्यकारी आदेश जारी केले आहेत. मात्र, त्यांच्या धोरणांमुळे अनेक महत्त्वाच्या संस्था बंद पडल्या आहेत किंवा त्यामधील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाच्या या कठोर वित्तीय धोरणांना कायदेशीर अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे. अनेक न्यायालयांमध्ये या निर्णयांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे मस्क हे ट्रम्प सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, त्यांच्या स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांनी सरकारसोबत अनेक करार देखील केले आहेत. यामुळे हितसंबंधांचे आरोप त्यांच्यावर केले जात आहे. या आरोपांवर बोलताना त्यांनी याबाबत पूर्णपणे पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे म्हटले आहे.