संघटनेत सुरू असलेला वाद मिटवा – नरेंद्र बात्रा

नवी दिल्ली- भारतीय ऑलिम्पिक संघटनेत सुरू असलेला वाद मिटवा, असे आवाहन अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून उपाध्यक्ष सुधांधू मित्तल आणि बात्रा यांच्यात अनेकदा वाद झाले होते. आरोप व प्रत्यारोपांमुळे हा वाद चांगलाच चिघळला होता. या वादाची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेलाही वेळोवेळी दिली जात होती. मात्र, जे झाले ते सर्व मागे टाका व खेळाडूंसाठी एकत्र यायला हवे, त्यामुळे हा वाद आता थांबवा, असे आवाहन बात्रा यांनी केले आहे.
संघटनेच्या अध्यक्षपदी बात्रा यांची झालेली निवड चुकीची असून त्यांनी या पदासाठी उमेदवारी जाहीर करताना जी कागदपत्रे दिली त्याबाबतही मित्तल यांनी शंका व्यक्त केली होती. हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतरही त्यातून बात्रा यांनाच पाठिंबा मिळाल्याने मित्तल यांनी क्रीडा लवादाकडे जाण्याचीही तयारी केली होती.
आता बात्रा यांच्या आवाहनला मित्तल व त्यांच्या पाठीशी असणारे सदस्य काय भूमिका घेतात यावरच हा वाद मिटेल का आणखी उफाळेल हे स्पष्ट होणार आहे. संघटनेतील हा वाद येत्या काळात संपुष्टात येऊन स्पर्धा सुरू करण्यासाठी सर्व सदस्य एकत्र येणार का, असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.





