मराठा आरक्षणासाठी 6 मे रोजी एल्गार परिषद ! सुभाष जावळे पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती

पिंपरी – मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची पुणे, पिंपरी-चिंचवड येथे शनिवारी (दि.6 मे) मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितली.
यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव माने, संभाजी सेना प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, मराठा आरक्षण समन्वय समिती ठाणेचे सचिव चंद्रकांत सावंत, मुंबईचे उपाध्यक्ष देविदास राजळे पाटील, रूपाली राक्षे पाटील, अनिता पाटील, संतोष वाघे, विजय कोरडे, गणेश सरकटे पाटील, गणेश भांडवलकर, सुरज ठाकर, आकाश हरकरे, हेमलता लांडे पाटील, ज्योती सगर आदी उपस्थित होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये. अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे. पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता व वस्तीगृहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करावी. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशा मागण्या एल्गार परिषदेत केल्या जाणार आहेत. पुणे-मुंबई महामार्गालगतच्या आकुर्डी येथील श्रमशक्ती भवनात 6 मे रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





