Shirur News : कृषी पंप सुरू करताना विजेचा धक्का बसला! 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू
Shirur News : गणेश भाऊसाहेब भोर असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिरूर : पाण्याची टाकी भरण्यासाठी शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सविंदणे (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. ८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. गणेश भाऊसाहेब भोर असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे भोर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सविंदणे येथील भाऊसाहेब झुंबर भोर हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा गणेश हा वडिलांना शेतीच्या कामात नेहमी मदत करत असे. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास परिसरात पाऊस सुरू असताना, जनावरांना पाणी नसल्याने शेतातील विद्युत कृषी पंप सुरू करून येतो, असे सांगून गणेश घरातून निघाला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली.
गणेशचा शोध घेत वडील भाऊसाहेब शेतात गेले. कृषी पंपाजवळ पोहोचताच त्यांना मोठा धक्का बसला. पंपाच्या विद्युत पेटीजवळ गणेश जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेला होता. पंपाचा विद्युत बॉक्स उघडा असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने रमेश भोर यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून पारगाव कारखाना येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
गणेशला तातडीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. अवघ्या १८ वर्षांच्या होतकरू युवकाचा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने सविंदणे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भोर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.





