Pimpri : देहूरोड परिसरात वाढती वीजचोरी

देहूरोड : परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचे समोर आले असून, याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे गंभीर आरोप स्थानिक वीज ग्राहकांनी केले आहेत. या विजचोरी प्रकरणात आर्थिक गोडबंगाल असल्याची चर्चा जोरात असून, अनेक रहिवाशांनी अधिकृत तक्रारी करणे सुरू केले आहे.
शिवाजी नगर, राजीव गांधी नगर, डॉ. आंबेडकर नगर, गांधी नगर, इंदिरानगर, शितळानगर, श्रीकृष्ण नगर, एम्बी कॅम्प, पारशी चाळ, पोर्टर चाळ, लक्ष्मी नगर, नायडू नगर अशा झोपडपट्ट्या आणि परिसरात ही विजचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. या भागातील अनेक ठिकाणी वीज मीटर न घेता थेट तारांमधून पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी विद्युत डीपीमध्ये थेट आकडे टाकून वीज चोरी केली जात असून, यात काही उद्योजकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्युत नियमांनुसार विद्यूतखांब व मीटर दरम्यान केबलची लांबी केवळ १०० फूट ठेवण्याची मर्यादा आहे, मात्र प्रत्यक्षात २०० ते ४०० फूट लांबीच्या केबल्स टाकून वापर केला जात आहे. या लोंबकळणाऱ्या व अनधिकृत केबल्स वारंवार वाऱ्याने तुटत असल्याने तात्पुरती जोडणी करून त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे परिसरात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनेक घरांमध्ये अधिकृत मीटरच नाहीत, तर काहीजण आपल्या घरातून दुसऱ्यांना थेट जोड देऊन वीज विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, वीज थकबाकीदारांचा यात मोठा समावेश असून त्यांची जोडणी तोडून मीटर जप्त करण्यात आले असतानाही ते चोरीमार्गे वीज वापरत असल्याचे उघड झाले आहे. परिसरातील अधिकृत वीज ग्राहकांनी महावितरणवर दुर्लक्षाचा आरोप केला आहे. महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून जाणूनबुजून कारवाई टाळली जात असल्याचा संशय ग्राहकांमध्ये व्यक्त केला जात आहे.
महावितरण प्रशासनाचे स्पष्टीकरण
देहूरोड महावितरण विभागाकडून वीज चोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विज चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जात आहे, चोरीसाठी मदत करणाऱ्या व्यक्तींनाही सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच या मोहिमेत महावितरणचे कर्मचारी सहभागी असल्याचे आढळल्यास त्यांच्यावरही तितकीच कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाने जाहीर केले आहे.





