१) मुंबईतील 17 झोपडपट्ट्यांमध्ये घरं तोडून बिल्डिंग बांधणार मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्यात. या निर्णयामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील (SRA) लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिंदे यांनी मुंबईतील १७ ठिकाणी एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्विकास समूह पुनर्विकास प्रकल्पांची घोषणा केलीय. या अंतर्गत जुनी घरे तोडून त्या जागेवर नवीन इमारती बांधण्यात येतील. तसेच एसआरएच्या ‘अभय योजने’ला आता डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे शक्य होणार आहे. एसआरए संबंधित तक्रारींच्या जलद निपटाऱ्यासाठी ‘एपेक्स ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटींची’ संख्या वाढविण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलय. २) नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात बदल नागपूर ते गोवा या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला होत असलेला विरोध आणि नागरिकांचे आक्षेप लक्षात घेऊन, राज्य सरकारने या मार्गाचे संरेखन (अलायनमेंट) बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या नव्या निर्णयानुसार, आता हा महामार्ग सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतून जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात बोलताना या संदर्भात माहिती दिलीय. ‘नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग’ हा राज्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. या महामार्गाचे नाव जरी ‘नागपूर ते गोवा’ असले, तरी याचा सर्वाधिक फायदा मराठवाडा विभागाला होणार आहे. मराठवाड्याचे चित्र हा महामार्ग बदलून टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ३) राज्यात वीज दर कमी होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केलीय. राज्यात विजेचे दर पुढील पाच वर्षांत वाढणार नाहीत, तर दरवर्षी दोन टक्क्यांनी (२%) कमी करण्यात येतील. गेल्या १५ ते २० वर्षांत विजेचे दर दरवर्षी नऊ टक्क्यांनी (९%) वाढत होते. मात्र, आता ही वाढ थांबवून दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विजेचे बिल वाढून येण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले, ते म्हणाले, इंधन कर समायोजन जे पूर्वी वर्षाच्या शेवटी व्हायचे, ते आता प्रत्येक महिन्याला होत आहे. यामुळे बिलात कधी ३० पैशांनी वाढ तर कधी ४० पैशांनी कपात होते. कपात झाल्यावर चर्चा होत नाही, पण वाढ झाल्यावर त्याची चर्चा होते, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ४) महाराष्ट्रात १११ कोटींचा घोटाळा महाराष्ट्राच्या बांधकाम विभागात १११ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणात कार्यकारी अभियंता नितीन भोये यांना तात्काळ निलंबित करण्यात आलंय. या निलंबनामुळे बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जव्हार बांधकाम विभागातील ठेकेदारांच्या जमा असलेल्या डिपॉझिट रकमेतून अनधिकृतरित्या १११ कोटी रुपये काढल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात, बांधकाम विभागातून चेक गहाळ होणे आणि सही खरी की खोटी अशा अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या होत्या. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार विजय वड्डेटीवार यांनी या घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या सर्व बाबींची दखल घेत, विशेष अधीक्षक तथा मुख्य अभियंता, सामाजिक बांधकाम प्रादेशिक विभाग, कोकण, मशा कांबळे यांनी कार्यकारी अभियंता नितीन भोये यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. ५) केरळमध्ये यूडीएफची जोरदार कामगिरी केरळमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहेत. अनेकदा राज्यातील राजकीय प्रवृत्तींचे संकेत देणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ (UDF) आघाडीने निर्णायक विजय मिळवला आहे. १५ वर्षांनंतर यूडीएफने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हा खरा विजय नोंदवला आहे. प्रखर सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेत, यूडीएफने सहापैकी चार महानगरपालिका, सात जिल्हा परिषदा, ५४ नगरपालिका, ७९ पंचायत समित्या आणि सुमारे ५०५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. सत्ताधारी डाव्या पक्षांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला मानहानीकारक धक्का बसला. त्यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या चार विद्यमान महानगरपालिका, चार जिल्हा परिषदा, शंभरहून अधिक ग्रामपंचायती आणि निम्म्याहून अधिक पंचायत समित्या गमावल्या आहेत. या निकालांमुळे येणाऱ्या काळात केरळच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. ६) महाराष्ट्राला मिळणार आणखी एक द्रुतगती मार्ग मुंबई आणि मराठवाड्यातील लातूर तसेच हैदराबादला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच एक नवीन द्रुतगती महामार्ग तयार होणार असून, यामुळे मुंबईहून लातूरपर्यंतचा प्रवास केवळ साडेचार तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या महत्त्वाकांक्षी महामार्गाबद्दल माहिती दिली. त्यांनी या प्रकल्पाला ‘जनकल्याण द्रुतगती महामार्ग’ असे संबोधले आहे. हा महामार्ग मुंबई-कल्याण-लातूर-महाराष्ट्र-हैदराबाद अशा मार्गावर तयार करण्यात येत आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर थेट हैदराबादपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे. ७) सिडनीच्या बोंडी बीचवर गोळीबार ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सिडनीच्या प्रसिद्ध बोंडी बीचवर आज, रविवारी सकाळी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या भयंकर घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. गोळीबार सुरू होताच बीचवर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये मोठी पळापळ आणि किंकाळ्यांचा आवाज ऐकू आला. जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी धावपळ केल्याचे थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेय. ही घटना हनुक्का उत्सव सुरू असताना घडली. या उत्सवासाठी अनेक लोक बीचवर जमले होते. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसर सील केलाय. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ८) 90 च्या दशकातील WWE सुपरस्टार निवृत्त नव्वदच्या दशकात संपूर्ण जगभरात लोकप्रिय ठरलेले WWE सुपरस्टार जॉन सीना यांनी अखेर कुस्तीच्या आखाड्यातून निवृत्तीची घोषणा केलीय. ‘नेव्हर गिव्ह अप’ या मंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या जॉन सीना यांना आता यापुढे WWE च्या रिंगमध्ये चाहत्यांना पाहता येणार नाही. जॉन सीना यांचा शेवटचा सामना शनिवारी गुंथर याच्या विरोधात झाला. या सामन्यात जॉन सीनाने पराभव पत्करला. गुंथरशी सामना खेळताना जॉन सीनाने टॅप आऊट करत पराभव स्वीकारला. सामन्यानंतर अनेक दिग्गज रेसलर्सनी जॉन सीनाला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामन्यानंतर पडद्यावर जॉन सीनाचा त्याच्या कारकिर्दीचा प्रवास दर्शवणारा एक भावनात्मक व्हिडिओ दाखवण्यात आला. यानंतर जॉन सीना यांचे बूट रिंगमध्ये ठेवण्यात आले. ही प्रथा निवृत्त झालेल्या दिग्गज रेसलर्ससाठी पाळली जाते. सामन्यानंतर जॉन सीनाने प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांचे आभार मानले. जॉन सीना यांच्या निवृत्तीमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. ९) धुरंधर चित्रपट बनला बॉक्स ऑफिसचा नवा किंग- बॉलिवूडमध्ये सध्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचेच वादळ सुरू आहे. प्रदर्शित होऊन दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई सुरू असून, त्याने हिंदी सिनेसृष्टीतील अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. ‘धुरंधर’ने दुसऱ्या शनिवारी सर्वाधिक कमाई करण्याचा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केलाय. हिंदी सिनेमाच्या इतिहासातील हा असा विक्रम करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या शनिवारी ‘धुरंधर’ने तब्बल ५३ कोटी ७० लाख रुपये (५३.७० कोटी) इतकी नेत्रदीपक कमाई केली आहे. या एका दिवसाच्या कमाईने चित्रपट विश्वात सगळ्यांनाच धक्का दिलाय. ‘धुरंधर’च्या या विक्रमी कमाईमुळे त्याने यापूर्वीचे ‘अॅनिमल’, ‘जवान’, ‘पुष्पा २’, ‘छावा’ आणि ‘स्त्री २’ यांसारख्या १० मेगाब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड्सही मागे टाकले आहेत. चित्रपटाच्या या तुफानी कमाईमुळे निर्मात्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, चित्रपट आणखी कोणते नवे विक्रम करतो, याकडे आता चित्रपटसृष्टीचे लक्ष लागलंय. १०) तिलक वर्मा अन् इंदू बर्मा यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा आणि नेपाळची सुंदर महिला क्रिकेटपटू इंदू बर्मा यांच्या अफेअरची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अनेक पोस्ट्समध्ये दोघांचे फोटो वापरले जात असून ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २८ वर्षीय इंदू बर्मा नेपाळसाठी ७८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. तिने १०४१ धावा करण्यासोबत ४० विकेट्स घेतल्या आहेत. ती तिच्या सौंदर्यासाठीही महिला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे. दुसरीकडे, तिलक वर्मा भारतासाठी आतापर्यंत ४३ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याने नेपाळमध्ये कधीही क्रिकेट खेळले नसल्यामुळे दोघांची भेट झालीच कधी, हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, सोशल मीडियावरील त्यांचे फोटो एआय जनरेटेड असल्याचा संशय आहे, ज्यामुळे या चर्चा केवळ अफवा असल्याचे मानले जात आहे.