जयदीप सूर्यवंशी Electricity : रावेत परिसरात अलिकडील काळात वीज पुरवठ्यात वारंवार खंड पडत असून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी होणारी लाइटची ये-जा आणि फ्लक्चुएशनमुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. अनेक सोसायटींना पर्यायी उपाय म्हणून जनरेटरवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे डिझेल खर्च वाढून आर्थिक ताण निर्माण होत आहे. वीज खंडित झाल्यानंतर पाणीपुरवठा विस्कळीत होणे, लिफ्ट सेवा बंद पडणे, तसेच घरगुती उपकरणांवर परिणाम होणे अशा समस्या वारंवार समोर येत आहेत. उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिकच त्रासदायक ठरत आहे. विशेषतः वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येते. काही सोसायटींनी सौरऊर्जा प्रकल्प उभारले असले तरी सध्याच्या वाढत्या मागणीच्या तुलनेत ती व्यवस्था अपुरी पडत आहे. परिणामी, जनरेटरचा वापर अपरिहार्य ठरत असून डिझेल खर्चात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे वीज बिलासोबतच अतिरिक्त खर्चाचा भार सोसायटीतील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. रावेत परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून नवीन गृहनिर्माण प्रकल्पांमुळे विजेची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर गहुंजे येथील प्रस्तावित सबस्टेशन लवकर सुरू होणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणा कार्यान्वित झाल्यास वीज पुरवठा अधिक स्थिर आणि सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. 8th Pay Commission: पुण्यातील बैठकीतून मोठी बातमी! किमान वेतन 65,000… पेन्शन, भत्ते आणि ग्रॅच्युइटीबाबत काय चर्चा झाली? दरम्यान, नागरिकांकडून महावितरणकडे ऑनलाइन तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून या प्रश्नावर लक्ष दिले जात असून आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी माहिती देण्यात येत आहे. नागरिकांनीही संयम राखत तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘मधुरांगण सोसायटी परिसरात रविवारी रात्री ते सोमवारी पहाटपर्यंत एका फेजचा पुरवठा खंडित झाला होता. तक्रार प्राप्त झाल्यानंतर तातडीने कारवाई करत वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी लोड व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासोबतच यंत्रणेत आवश्यक सुधारणा करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना अखंडित व स्थिर वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.’ – रत्नदीप काळे, सहाय्यक अभियंता देहूरोड आणि रावेत विभाग महावितरण “रावेत, किवळे आणि आदर्शनगर परिसरातील वाढत्या विजेच्या मागणीसाठी गहुंजे येथील सबस्टेशन लवकरात लवकर कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यासाठी महावितरण अधिकारी आणि राज्यस्तरीय नेत्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. प्रभाग १६ मध्ये सुरळीत वीज पुरवठा रहावा यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरच योग्य तो मार्ग निघेल.” — बापू कातळे, संस्थापक अध्यक्ष, संकल्प सोशल फाउंडेशन “अनियमित वीज पुरवठ्यामुळे जनरेटरवर अवलंबित्व वाढले आहे. अलिकडेच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक तास सोसायटी जनरेटर चालू होता. त्यामुळे डिझेलची नासाडी होऊन सोसायटीला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. सोसायटी रहिवाशांनी ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत.” — सोमनाथ गुरव, मधुर अंगण सोसायटी, ए विंग, रावेत हेही वाचा : Pune news : नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी.! पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश