पुणे जिल्ह्यातील 458 कृषिपंपांना वीजजोडणी

पुणे – शेतकऱ्यांना शाश्‍वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणालीची कामे आता प्रगतीपथावर असून राज्यात आतापर्यंत सुमारे 5 हजार 894 शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातील 7 हजार 702 कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात येणार असून आतापर्यंत 458 कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या अभिनव संकल्पनेला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी या योजनेच्या माध्यमातून गती दिली. त्यानुसार पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी सरासरी 2 लाख 50 हजार रुपयांचा अंदाजित खर्च येणार असून अडीच लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या 33 हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने 10 व 16 केव्हीएचे सुमारे 1 लाख 30 हजार इतक्‍या मोठ्या प्रमाणात रोहित्र लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान व साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत थोडा विलंब झालेला असल्याची कबुली महावितरणकडून देण्यात आली.

दर्जेदार, अखंडित वीजपुरवठा मिळणार
या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळणार असून 1 किंवा 2 शेतकऱ्यांसाठी समर्पित रोहित्र राहील. शेतकऱ्यांमध्ये रोहित्राप्रती स्वामित्वाची भावना राहणार असून शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल. लघू व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी या योजने अंतर्गत सिंचनाची उद्दिष्टपूर्ती साधता येईल. तसेच, रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होऊन तांत्रिक व वीजहानीचे प्रमाण कमी होईल, अशा विश्‍वास महावितरणकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.