बाराशे कोटी रुपये खर्च : 120 प्रवाशांची आसनक्षमता
पिंपरी – शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी 20 वर्षांपूर्वी उच्चक्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) प्रस्तावित करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले होते. त्यानुसार, पिंपरी-चिंचवडमधील एचसीएमटीआर म्हणजेच रिंगरोडवर एलिव्हेटेड इलेक्ट्रीक निओ मेट्रो प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महामेट्रोने या प्रकल्पासाठी सुमारे 1 हजार 200 कोटी रुपये खर्च गृहीत धरला आहे. लवकरच अंतिम विस्तृत प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) सादरीकरण महापालिका पदाधिकारी, गटनेत्यांसमोर केले जाणार आहे.
शहरातील कासारवाडी, नेहरूनगर, भोसरी एमआयडीसी, स्पाइन रस्ता, भक्ती-शक्ती चौक, रावेत, वाल्हेकरवाडी, काळेवाडी फाटा, रहाटणी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव आणि कासारवाडी असा नियोजित 30 किमी लांबीचा व 30 मीटर रुंदीचा हा वर्तुळाकार मार्ग प्राधिकरण व महापालिका हद्दीतून जातो. सद्य:स्थितीत महापालिकेच्या ताब्यात 16.35 किलोमीटर रस्ता आहे. उर्वरित ठिकाणी रिंगरोड विकसित करण्यासाठी बाधित नागरिकांचा विरोध आहे. या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीसाठी मेट्रो, ट्राम, बीआरटी, लाईट रेल की मोनोरेल यापैकी कोणता पर्याय राबवायचा, हे ठरविण्यासाठी महामेट्रोला “डीपीआर’ बनविण्यास सांगितले होते.
महामेट्रोने “डीपीआर’मध्ये या मार्गावर इलेक्ट्रीक निओ मेट्रो हा पर्याय सुचविला आहे. त्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला होता. या प्रकल्पाचा अंतिम “डीपीआर’ तयार झाला आहे. लवकरच महामेट्रोकडून त्याचे महापालिकेला सादरीकरण करण्यात येणार आहे. तीन डब्ब्याच्या या मेट्रोतून 120 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. तसेच याच मार्गिकेवर मिनी रेल करण्याचे प्रयोजन महापालिकेचे आहे.
प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाचा “डीपीआर’ करताना महामेट्रोने या मार्गाचे सर्वेक्षण केले. तसेच, “डीपीआर’ करताना त्यांनी काही ठिकाणी रिंगरोडच्या मार्गात बदल करणे शक्य आहे. तसे बदल सुचविले आहेत. त्यामुळे रिंगरोडमुळे बाधित होणारी काही घरे देखील वाचणार आहेत. महामेट्रोने या प्रकल्पासाठी प्रति कि.मी. 40 कोटी म्हणजेच सुमारे 1 हजार 200 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.