वॉशिंग्टन – ज्यो बायडेन यांना अमेरिकेचे भावी अध्यक्ष आणि कमला हॅरिस यंना भावी उपाध्यक्ष म्हणून आज इलेक्टोरल कॉलेजकडून अधिकृतपणे घोषित करण्यात आले. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या “निवडणूकीत गैरव्यवहार झाला’ असल्याचे आरोप आणि कायदेशीर खटपटींना पूर्णविराम मिळाला आहे.
अमेरिकेची राज्यघटना आणि प्रांतिय कायद्यांनुसार इलेक्टोरल कॉलेजने अध्यक्षांसाठीचे मत सोमवारी नोंदवले. 3 नोव्हेंबरला प्रत्येक राज्यांमध्ये झालेल्या मतदानाच्या निकालाच्या आधारे इलेक्टोरल कॉलेजकडून हे शिक्कामोर्तब केले गेले.
ट्रम्प यांना या निवडणूकीत पॉप्युलर व्होटच्या संख्येच्या प्रमाणात पराभव स्वीकरावा लागला आहे. त्याशिवाय 538 सदस्यांच्या इलेक्टोरल कॉलेजमध्येही ट्रम्प पराभूत झाले. थोडक्यात, इलेक्टोरल कॉलेजची बैठक ही केवळ औपचारिकता असते.
मात्र ट्रम्प यांच्याकडून वारंवार निवडणूकीतील गैरव्यवहाराचे आरोप व्हायला लागले असल्याने या बैठकीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. आज दिवसभर देशभरातून इलेक्टोरल कॉलेजच्या मतांचा निकाल लागला. कॉंग्रेसचे सदस्य आणि हाऊस डेमोक्रॅटिक कॉकसचे मुख्य उपप्रतोद डॅन किल्डी यांनी निवडणूकांचा निकाल जाहीर केला.
मात्र ट्रम्प यांनी अद्याप निवडणुकीतील पराभव स्वीकारलेला नाही. निवडणुकीच्या निकालांविरूद्ध त्यांनी अनेक खटले दाखल केले, मतदानादरम्यान मोठ्या प्रमाणात घोटाळा आणि निवडणूक गैरप्रकार झाले असल्याचे आरोप त्यांनी केले होते. मात्र न्यायालयामध्ये हे आरोप सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे सर्व दावे फेटाळले गेले आहेत.