प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जंगी सुरुवात केली असून, प्रभागनिहाय चित्र स्पष्ट झाल्यानंतर आलेला पहिलाच रविवार उमेदवारांनी पदयात्रा आणि घरोघरी भेटी देऊन सत्कारणी लावला.पहिल्याच रविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. काहींनी पदयात्रा काढल्या, तर काहींनी घरोघर भेटी दिल्या. काही पक्षांनी नेत्यांचे रोड शो केले. शिवसेना (उबाठा) जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांचा रोड शो आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची सभा हे प्रचाराचे शुभारंभ ठरले. याशिवाय अन्य पक्षांनीही स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले असून, त्याचे दिवस आणि वेळांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. २९ महापालिकांमध्ये निवडणूक होत असल्याने स्टार प्रचारकांच्या तारखा मिळवणे, सभा आयोजित करणे, हा पक्षांपुढील मोठा टास्क आहे. सोमवारी पुण्यात येरवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे.महापालिका निवडणुकीचे चित्र शुक्रवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर स्पष्ट झाले. शनिवारी सर्वपक्षीयांनी प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर आलेल्या प्रचारासाठीच्या पहिल्याच रविवारी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी घरोघर जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांना माहितीपत्रक दिले. काही ठिकाणी टेकडी, उद्याने, ज्येष्ठ नागरिक कट्ट्यावर मतदारांशी संवाद साधण्यात आला. काही ठिकाणी दुचाकी फेरीही काढण्यात आली.शिवसेनेचे (ठाकरे) पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर यांनी शहरातील शिवसेनेच्या प्रमुख उमेदवारांच्या प्रभागात प्रचारफेरी काढली. या वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचेही काही पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनीही घरोघर गाठीभेटी घेतल्या, तसेच पदयात्रा, दुचाकी फेरी काढत प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. याच वेळी पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेत प्रचाराच्या नियोजनाविषयी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांशी चर्चा करत प्रचाराचे प्राथमिक नियोजन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याही उमेदवारांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या सहकारी उमेदवारांसोबत घरोघरी प्रचार केला व प्रचारफेऱ्याही काढल्या. प्रचाराच्या नियोजनासंदर्भात पक्षाच्या नेत्यांची बैठकही झाली. प्रचाराची धुरा स्थानिक नेत्यांवर सोमवारपासून पुढील आठवडाभर प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रमुख नेत्यांच्या सभा, रोड शो, टॉक शो, वार्ताहर परिषदेचे आयोजन केले आहे. एकाच वेळी सर्व २९ महापालिकांसाठीची निवडणूक होणार असल्याने प्रमुख नेत्यांची उपलब्धता हे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे प्रचाराची धुरा ही स्थानिक नेत्यांवरच असणार आहे.