समाजमाध्यमांनी व्यापली निवडणूक ; फेसबूक,व्हाटसऍपच्या माध्यमातून जोरदार प्रचार

नगर: लोकसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या अर्ज भरले, छाननी झाली ,निवडणुक चिन्हांचे वाटप झाले , प्रत्यक्ष उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला मात्र यंदा निवडणुकीचे वातावरण अद्याप तयार होतांना दिसत नाही किंबहुना तसे आपल्याला तरी जाणवत नाही याचे कारण म्हणजे प्रचाराचे होर्डींग,प्रचाराच्या रिक्षा वगैरे काहीच दिसत नाही.याचे कारण म्हणजे प्रत्येक पक्षाने आपला प्रचार सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरू केला आहे. एका अर्थाने ही निवडणूक समाजमाध्यमांनीच व्यापली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

हल्ली प्रत्येकाजवळ स्मार्ट फोन आहेच असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . आणि स्मार्ट फोन आहे म्हटल्यावर त्यात फेसबूक , व्हाटस ऍप ,ट्विटर ,लेटस ऍप , इन्स्टाग्रॅम आणि ब्लॉग ही समाज माध्यमं आलीच त्यावरूनच सर्व पक्षांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्षाने आपले मिडीया एक्‍सपर्ट त्या -त्या विभागाकडे लक्ष देण्यासाठी बसविले आहेत. त्यामुळेच फोनवरूनच आता उमेदवार आपआपली बाजू मांडतांना दिसत आहेत. शिवाय आपल्या म्हणण्या बरोबरच आपल्या जाहिराती ,छबी सर्व काही आपल्या मर्जी प्रमाणे मांडता येत असल्याने यावेळी समाजमाध्यमांवर जास्त भर देण्यात आला आहे.

एखादा मजकूर आकर्षकपणे केलेल्या डिझाईन मध्ये टाकून तो समाज माध्यमांवर टाकला की काम झाले पुढे फेसबूक, व्हाटस ऍप वर येणारे मजकूर फॉर्वर्ड करणारे ढकलू असतातच ते तो मजकूर आपोआप काही हजार लोकांपर्यंत सहजच पोहोचवितात . इतके सोपे काम झाल्याने उमेदवार आता बाकीच्या भानगडीत पडायला तयार नाहीत. शिवाय फेसबूक, व्हाटसऍप वरील मजकूराचा जुजबी खर्च निवडणुक खर्चात दाखविला की काम झाले. शिवाय मोबाईल कंपन्यांनी देखील बल्क एस. एम. एस. ची सेवा तसेच बल्क व्हॉईस एस.एम. एस. ची सेवा उपलब्ध करून दिल्याने उमेदवारांचे काम सोपे झाले आहे.

एखाद्या भागात प्रचाराची भिंत रंगवायची अथवा बॅनर लावायचे म्हटल्यास ज्याच्या मालकीची भिंत आहे त्याची मनधरणी करा ,परवानगी काढा , त्यात त्याने जागेची आणि पर्यायाने येणाऱ्या सर्व करांची पुर्तता केली आहे की नाही ते पहा मग पुन्हा निवडणुक झाल्यानंतर ती भिंत स्वच्छ करण्याची हमी द्या एव्हढे सर्व सोपस्कार पार पाडे पर्यंत कार्यकर्त्यांची दमछाक व्हायची. त्यापेक्षा एखाद्या भागातील मोक्‍याच्या ठिकाणी होर्डींग लावायचे त्याचे भाडे कराराने पैसे दिले कि निवडणुक संपल्या बरोबर ती जागा मोकळी होते एव्हढा साधा फंडा उमेदवारांनी वापरायला सुरवात केली आहे.

शिवाय अगदीच नाइलाज झाला तर वर्तमान पत्रातून महत्वाच्या कार्यक्रमांच्या जाहिराती दिल्या की काम झाले.
भोंगे लावून रिक्षा फिरवायची म्हटलंतरी त्या रिक्षाची कागदपत्रे घ्या त्याने सर्व कर भरले आहेत की नाहीत ते पहा मग रेकॉर्डिंग केलेल्या सी डी च्या तीन प्रति निवडणुक शाखेत जमा करा त्यांचेकडून नाहरकत दाखला मिळवा एव्हढे सर्व सोपस्कार केल्यानंतर भोंग्याच्या आवाजाचे डेसिबल ठरवून दिल्याप्रमाणेच भोंगा वाजवा त्यातून ध्वनीप्रदुषण होणार नाही याची काळजी घ्या एव्हढे करण्यापेक्षा समाजमाध्यमेच जवळ करणे उमेदवारांनी पसंत केलेले दिसते.शिवाय त्यात स्थिर तसेच चलतचित्राच्या माध्यमातून आपल्याला हवातसा मजकूर सर्वांपर्यंत अगदी बिनदिक्कत पोहोचविता येतो.

डिझायनर्सची चलती

सोशल माध्यमांसाठी काम करणाऱ्या युवकांची सध्या कमतरता नाही. त्यातही डिझायनिंग करणाऱ्या युवकांना या निवडणुकीच्या काळात मुबलक काम मिळत आहे. आकर्षक ,कल्पक जाहिराती ,मजकूर करून फेसबूक .व्हाट्‌सऍप वर पाठविण्याचे काम त्यांच्याकडुन करवून घेतले जाते त्याचा मोबदला त्यांना दिला जातो.काही कलाकारांशी तर वार्षिक करारही केला जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.