कलंदर: निवडणूक आरंभ…

उत्तम पिंगळे

येणार येणार म्हणताना एकदाची लोकसभा निवडणूक अकरा तारखेपासून सुरू झाली. प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो असता त्यांनी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण समजावून सांगितली. सरकारही नवमतदारांसाठी अगदी शेवटपर्यंत मतदार यादी अद्ययावत करीत असते.

प्राध्यापक पुढे म्हणाले की, आज आपला देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे व देशाच्या संसदेसाठी मतदान होत असताना त्यात प्रत्येक व्यक्तीचा सहभाग अपेक्षित आहे. एकूणच निवडणुकीत मतदान हे महत्त्वाचे अंग आहे. मतदानावर सारे अवलंबून आहे. वेगवेगळ्या जाहिरातींतून सरकार लोकांना मतदान करायचे आवाहन करीत असते. खरं तर लोकशाहीतील सर्वात मोठ्या सोहळ्यात लोकांना मतदान करण्याचे आवाहन करावयास लागणे हे मोठे दुर्दैव आहे. लोकांनी त्यात हिरीरीने भाग घेतला पाहिजे व मतदान हे आपले आद्य कर्तव्य आहे असे समजून ते योग्य प्रकारे पार पाडावयास हवे. पण त्यासाठीही जाहिरातबाजी करावी लागते म्हणजे लोक मतदानास गांभीर्याने घेत नाहीत.

मग मी त्यामध्ये माझा मुद्दा मांडला. मी सरांना म्हणालो की, त्याचे कारणही तसे आहे. आज सर्वसाधारण मतदारांच्या नजरेत राजकीय नेते व पक्ष हे भ्रष्ट व्यक्ती व त्यांचे कंपू आहेत, असे वाटते. राजकारण म्हटले की भ्रष्टाचार व गुन्हेगारी यांची मिलीभगत असे वाटते. अर्थात त्याला कारणही तसेच आहे की, कित्येक नेत्यांवर भ्रष्टाचार लाचखोरी व गुन्हेगारीचे आरोप आहेत. अशावेळी सामान्य माणूस यात पडावयास मागत नाही. त्यांच्या दृष्टीने हे क्षेत्र आपले नाहीच असा समज झालेला आहे. आपण पाहतो की नेत्याने घोषित केलेले संपत्तीचे आकडे पाहिले तर सामान्यांना ही संपत्ती नेमकी आली कुठून व ती घोषित केली म्हणजे ती रितसर असणार. मग त्या नेत्याने असे काय कार्य केले की त्याला एवढी संपत्ती मिळाली? बंर ही तर घोषित केलेली संपत्ती पण अनेक व्यक्तींचे बेनामी व्यवहारही उघडकीस येत आहेत.

माझे बोलणे ऐकून प्राध्यापक म्हणाले की, तुम्ही म्हणता त्यात तथ्य नाही असे नाही; पण सारेच नेते असे आहेत असे नाही. मग मी म्हणालो की, प्रमाण पाहिले तर… त्यावर मला थांबवत ते म्हणाले, बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसे खटले आहेत; पण तुमच्याकडे चांगली व्यक्ती निवडण्याचा पर्याय आहे ना? उभे राहिलेले सारेच भ्रष्ट असतात असे थोडेच आहे? मागे एक जाहिरात दाखवली जात होती की, आपण बाजारातून साधे बटाटे घेत असतानाही ते चांगले पारखून निवडून घेतो मग यांच्या हाती आपण सत्ता सोपवणार आहोत त्यांना थोडे तपासून घ्यायला नको का? उभे असलेले बहुतेकजण पत्रके वाटून आपली माहिती देत असतात. त्यातून आपल्याला समजून येते की कोण व्यक्ती उभी आहे व काय तिचे कार्य आहे. तसेच आजकाल एकाच ठिकाणच्या सर्वच उमेदवारांना एकाच मंचावर बोलावून त्यांच्याशी वार्तालाप केला जातो. त्यातून कोण व्यक्ती चांगली आहे हे समजू शकते.

माझ्या एका मताने काय फरक पडणार असे म्हणणारे कितीतरी आहेत जे मतदानाला जात नाहीत; पण त्यांची संख्या खूप मोठी असते. त्यांनी नीट विचार करावयास हवा की, आपल्याला मोठी संधी आहे व तिचा उपयोग करावयास हवा. आपण मतही द्यायचे नाही व सरकार बनण्याच्या प्रक्रियेत सामील व्हायचे नाही आणि नंतर सरकारी निर्णयावर आपले मत व्यक्त करायचे हे बरोबर नाही. अगदीच वाटत असेल तर त्यातल्या त्यात चांगल्या व्यक्तीला मत देऊन आपला मतदानाचा हक्क बजावू शकता. सरते शेवटी “नोटाचा’ पर्यायही आहेच. पण मतदान नक्की करा. आपणास काय वाटते?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.