Election Result : पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचे (Election Result) चित्र स्पष्ट झाले असून तामिळनाडू वगळता चारही राज्यात अपेक्षित निकाल लागले आहेत. खरं म्हणजे पाच पैकी केवळ एकाच राज्यावर भाजप आणि देशाचं लक्ष लागलेलं होतं, ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. तेथे भाजपाने विजय मिळवण्याचे उद्दिष्ट खूप आधीच निश्चित केले होते. काहीही करून हे राज्य जिंकायचंच ही त्यांची इच्छा आता पूर्ण झाली. भाजपाच्या बंगालमधील विजयाला कोणकोणते घटक कारणीभूत (Election Result) आहेत याचा हिशेब लावायला बसल्यानंतर अनेक घटक ताबडतोबीने नजरेसमोर येतात. त्यामध्ये एसआयआर प्रक्रियेत तेथे काटण्यात आलेली 92 लाख मते, ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगासह निमलष्करी दलाचा तेथे करण्यात आलेला अतोनात वापर वगैरे मूलभूत बाबी तर आहेतच, पण काही प्रमाणात सत्ताविरोधी लाटही तेथे होती. त्याचाही मोठा फटका तृणमूल काँग्रेसला बसला असे आतापर्यंतचे विश्लेषण आहे. आता प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर अशा विश्लेषणाला फार महत्त्व उरत नाही. भाजपाच्या हातात एक मोठे आणि महत्त्वाचे राज्य आले आहे ही भाजपसाठी या निवडणुकीतली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. पश्चिम बंगालमधील विजयाचा भाजपाला या पुढील काळात अनेक अर्थाने राजकीय लाभ होणार आहे. त्यातला मुख्य लाभ असा की, आगामी काळातील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराची (Election Result) बाजू आणखी बळकट होणार असून भाजपचे राज्यसभेतील बहुमतही आणखी वाढणार आहे. तशातच 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमधील पक्षाची सत्ता भाजपसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये सगळे घटक विरोधात असतानाही ममता बॅनर्जी यांनी एकहाती कडवी झुंज दिली हेही तितकेच खरे. या राज्यात काँग्रेस आणि डावी आघाडी वेगवेगळी लढली आणि या दोन्ही पक्षांनी भाजपविरोधी मतांमध्ये मोठी फूट पाडण्याची कर्तबगारी दाखवली, त्याचाही फटका ममता यांना बसला. बाकी आसाममध्ये भाजपाचे सरकार तिसर्यांदा सत्तेवर आले, हेही अपेक्षितच होते. कारण तेथे त्यांनी बिहार आणि महाराष्ट्रासारखा फंडा वापरताना ऐन निवडणुकीपूर्वी तेथील महिलांच्या खात्यात भली मोठी रक्कम वर्ग केली होती. Election Result तेथे मतदारसंघाची आपल्या राजकीय सोयीनुसार फेररचनाही केली. त्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक अवघड जाणार हे आधीपासूनच स्पष्ट झाले होते. काँग्रेसने केरळात मात्र एकहाती वर्चस्व मिळवताना आपल्या ताब्यात आणखी एक राज्य घेतले आहे हीच काँग्रेससाठी दिलासाजनक बाब ठरली आहे. केरळमध्ये विजयन यांचे सरकार गेली दहा वर्षे सत्तेवर होते. तेथे डावे पक्ष आणि काँग्रेस यांना आलटून पालटून सत्ता देण्याची तेथील मतदारांची परंपरा आहे. याला फक्त गेल्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद होता. तेथे विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने सलग दुसर्यांदा विजय मिळवला होता. त्यामुळे या निवडणुकीत मात्र त्यांना पराभव पत्करावा लागेल हे सगळेच गृहीत धरून चालले होते. त्यानुसार तेथे अपेक्षित निकाल लागला आहे. येथे एक गोष्ट मात्र आवर्जून नमूद करावी लागेल की मुख्यमंत्री विजयन यांनी केरळमध्ये दारिद्य्र निर्मूलनासाठी लक्षणीय कामगिरी केली आहे. सर्व कल्याणकारी सरकारी योजना अत्यंत गरीब असलेल्या लोकांच्या दारात स्वतःहून नेऊन टारगेटेड पद्धतीने त्यांना या योजनांचे लाभ दिले त्यातून जवळपास सगळीच कुटुंबे गरिबी रेषेच्या वर आली असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. पण दुर्दैवाने त्यांना यावेळी पराभव पत्करावा लागला. सगळ्यात आश्चर्यकारक निकाल तामिळनाडू राज्यात नोंदवला गेला आहे. तेथील मतदारांनी द्रमुक आणि अद्रमुक या दोन परंपरागत राजकीय पक्षांना दूर सारून थलपती विजय यांच्या पक्षाला कौल दिला आहे. केवळ दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या टीव्हीके पक्षाने तामिळनाडूत मिळवलेले हे लक्षणीय यश कौतुकास्पद म्हणावे लागेल. टीव्हीके या पक्षाला आपल्या बाजूला ओढण्यासाठी भाजपाने सुरुवातीपासूनच खूप प्रयत्न केले, पण विजय यांनी अत्यंत निकराने भाजपला आपला विरोध नोंदवला. याची त्यांना किंमतही मोजावी लागली, कारण, त्यामुळे विजय यांच्या निकटवर्तीयांवरसुद्धा ईडीचे छापे घातले गेले. पण तरीही विजय नमले नाहीत आणि त्यांनी एकाकी झुंज देत तमिळनाडूत चमत्कार घडवला आहे. अगदी सुरुवातीच्या काळात विजय यांनी काँग्रेसला बरोबर घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठी काँग्रेसला 70 जागाही देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. पण द्रमुक या आपल्या जुन्या मित्र पक्षाची साथ सोडणे काँग्रेसला भावनिकदृष्ट्या जड गेले आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. आता अर्थात तामिळनाडू त्रिशंकू स्थिती असल्याने विजय थलपती यांच्या पक्षाकडून काँग्रेसला पुन्हा एकदा युतीची हाक दिली गेली आहे. त्यावर काँग्रेस आता काय भूमिका घेणार यावर तेथील सत्ता समीकरण अवलंबून आहे. भाजपानेही टीव्हीकेला ऑफर दिली आहे, पण ही ऑफर ते स्वीकारतील की नाही याविषयी शंका आहे. या निकालानंतर आता पुढचे काही महिने बंगालमधील निवडणूक निकालाचे कवित्व कायम राहणार आहे. बंगालमधील विजय हा हिंदुत्वाचा विजय असल्याचे भाजपकडून सातत्याने सांगितले जाईल आणि त्यातून पुन्हा अन्यत्र आपल्याला अनुकूल अशी वातावरणनिर्मिती केली जाईल. पण बंगाल हे एकमेव असे राज्य आहे जिथे धर्माच्या आधारावर फार राजकारण केले जात नाही. त्यामुळे बंगालमधील आपला विजय हा केवळ हिंदुत्वाचा विजय असल्याचे भाजपकडून सांगितले जाणार असले तरी त्यात फार तथ्य आहे असे मानता येणार नाही. बंगालमध्ये सत्ता मिळवायचीच ही भाजपाची इच्छा 15 वर्षांनंतर पूर्ण झाली आहे यात भाजपने आणखी काही दिवस आनंदात घालवायला हरकत नाही.