हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवड

मुंबई – मागील अधिवेशनापासून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा रखडलेला आहे. पण, आता विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच होईल व अध्यक्ष कॉंग्रेस पक्षाचाच होईल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईमधील टिळक भवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले आहे.
नाना पटोले म्हणाले, करोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांची कालावधी लागतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल.
आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी सांगितले.





