Election News : जिल्ह्यातील कोपरगाव, देवळालीप्रवरा, नेवासा आणि पाथर्डी या चार पालिकासह अन्य पालिकांच्या 15 प्रभागाच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशीरा दिलेल्या आदेशानुसार स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने दिलेला आदेश आणि न्यायालयाचा आदेश याबाबत संभ्रम असल्याने रात्री उशीरापर्यंत प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय दिला गेला नाही. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री दिलेल्या आदेशानुसार नगरपरिषदा व नगरपंचायतमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होते. परंतु अपीलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून दि.22 नोव्हेंबरनंतर म्हणजे 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर देण्यात आलेला आहे. अशा नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणूका 4 नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येवू नये. अशा प्रकारणात नगराध्यक्षपदाचा समावेश असल्यास त्या नगरपरिषदा व नगरपंचायतीची संपुर्ण निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा या चार पालिकांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा पालिकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. परंतु निवडणुकीत काही ठिकाणी उमेदवारांविरोधात न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे. आता त्या निवडणुका सुधारित कार्यक्रमानुसार होणार आहे. जिल्ह्यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा या चार पालिकांसह अन्य सहा पालिकांच्या 15 प्रभागाच्या निवडणुका देखील स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यात संगमनेर 3,राहुरी 1, श्रीगोंदा 1, शेवगाव 3. जामखेड 2, शिर्डी 3 या पालिकांच्या प्रभागाचा समावेश आहे. त्यात संगमनेरमध्ये प्रभाग 1 ब, प्रभाग 2 ब, प्रभाग 15 ब. राहुरी- प्रभाग 5 अ, शेवगाव- प्रभाग 1 अ, प्रभाग 5 अ, प्रभाग 12 अ, तर शिर्डी- प्रभाग 11 अ, प्रभाग 6 अ या प्रभागाचा समावेश आहे. ज्या उमेदवारांच्या अपीलावर 23 नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर आदेश पारीत झाले असतील, त्या ठिकाणीच्या संबंधित सदस्यांच्या जागेसाठी तसेच नगराध्यक्षपदाबाबत निकाल असलेल्या नगरपरिषद-नगरपंचायतीच्या निवडणुका नवीन कार्यक्रमानुसार होणार आहेत. जिल्ह्यातील पाथर्डी, नेवासा, कोपरगाव व देवळाली या चार पालिकांच्या नगराध्यक्षसह सदस्य पदावर न्यायालयात अपील दाखल झाले होते.