Election News – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पक्षाच्या प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले आमदार अमोल मिटकरी, माजी खासदार समीर भुजबळ, माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पक्षाच्या ४० स्टार प्रचारकांची यादी घोषित केली. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, नवाब मलिक, अभिनेते सयाजी शिंदे यांचा समावेश आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी त्यांना महिनाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश नाही. तथापि, भुजबळ हे पक्षाचे नेहमीचे स्टार प्रचारक राहिले आहेत. मात्र, यावेळी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना प्रचारासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होणार नाही. त्यामुळे समीर भुजबळ हे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळतील, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे.