प्रभात वृत्तसेवा पुणे – अगामी महापालिका निवडणुकीत शहरातील ९ प्रभागांमध्ये लाडक्या बहिणी गेमचेंजर ठरणार आहेत. या प्रभागांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे.महापालिकेकडून निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, शहरात एकूण ३५ लाख ५१ हजार ४५९ मतदार असणार आहेत. त्यात १८ लाख ३२ हजार २०५ पुरुष असून, महिला मतदारांची संख्या १७ लाख १८ हजार ७७५ आहे, तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ४८९ आहे. जवळपास २ ते ४ प्रभागांमध्ये पुरुष आणि महिला मतदारांमध्ये अवघा १०० ते ५०० मतदारांचा फरक आहे. त्यामुळे त्या प्रभागांमध्येही महिला मतदारांचा टक्का निर्णायक असणार आहे. राज्यात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेनंतर मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याने या ९ प्रभागांमध्ये उमेदवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.ज्या प्रभागांमध्ये २०१७ मध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्याच प्रभागांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे. विशेषत: शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील एका प्रभागात, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील दोन प्रभागांत, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एका प्रभागात, तर कसबा विधानसभा मतदारसंघात जवळपास पाच प्रभागांत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात एका प्रभागात महिला मतदार अधिक आहेत. त्यामुळे या लाडक्या बहिणी कोणाच्या पारड्यात आपला कौल देणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.