प्रभात वृत्तसेवा पुणे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना मतदान यंत्रावर (ईव्हीएम) पहिले स्थान मिळणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावरील पक्षातील उमेदवारांचे नावे मतदान यंत्रांवर असणार आहे. तर सर्वात शेवटी अपक्ष उमेदवारांचे नाव असणार आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नियमात बदल केला असून, त्यानुसार सूचना निवडणक निर्णय अधिकारी यांना दिल्या आहेत. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांची नावे अद्याक्षरांच्या क्रमानुसार मतदान यंत्रांवर घेण्यात येत होती. आता यामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून बदल करण्यात आला आहे. अनेकदा, समान आडनावे किंवा नावाच्या आद्याक्षरामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता, तो या नव्या पद्धतीमुळे दूर होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे नावे मतदान यंत्रांवर अर्थात ईव्हीएम मशीनवर घेण्याचे प्राधान्यक्रम ठरले आहेत. त्याच धर्तीवर आता हीच पद्धत राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारली आहे. उमेदवारांचे नावे मतदान यंत्रावर घेताना त्या गटातील उमेदवारांची नावे त्यांच्या नावाच्या अद्याक्षराप्रमाणे मराठी लिपीतील क्रमानुसार घेतली जाणार आहेत. या निर्णयामुळे मतदानाची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील मतदारांना, पक्षाच्या चिन्हावरून उमेदवाराची ओळख तत्काळ पटवणे सोयीचे होईल. मतदारांना विशिष्ट राजकीय पक्षाच्या उमेदवाराला ओळखण्यास मदत व्हावी आणि त्यांचा गोंधळ टाळता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मतदान यंत्रावर उमेदवारांचा असा असणार क्रम -पहिला गट – राष्ट्रीय स्तवरावरील पक्ष, राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार -दुसरा गट – इतर राज्यातील आयोगाकडे नोंदणीकृत राज्यस्तरीय पक्ष उमेदवार -तिसरा गट- आयोगाकडे नोंदणी झालेले अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार -चौथा गट – अपक्ष उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक-एक मताला अधिक महत्त्व असते. अशावेळी एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून वेगवेगळ्या खेळी आखल्या जातात. यामध्ये समान नावे असलेले उमेदवार उभे करतात. यापूर्वी अद्याक्षराप्रमाणे समान उमेदवारांची नावे ईव्हीएमवर एका खालोखाल येत होती. त्यामुळे काही मतदारांचा गोंधळ होऊन कुठल्या उमेदवारांना मतदान करायचे याचा संभ्रम होत होता. आता हा संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाने क्रमवारी ठरविली आहे.