मुंबई : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.मतदार संख्या, मतदान केंद्रे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि मनुष्यबळाचा विचार करून नियोजन केले जात आहे. यासाठी १ जुलै २०२५ पर्यंत नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रांची संख्या वाढणार वाघमारे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र मतदार यादी तयार केली जात नाही, तर भारत निवडणूक आयोगाची १ जुलै २०२५ ची मतदार यादी वापरली जाईल. याबाबत भारत निवडणूक आयोगाशी चर्चा झाली आहे. या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत असल्याने विधानसभेच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्या वाढेल. मतदान केंद्र निश्चितीसाठी आयोगाने स्वतंत्र निकष ठरवले आहेत. सर्वसामान्य आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश देण्यात आले. मतदान यंत्रांचा अचूक आढावा घेऊन तातडीने प्रथमस्तरीय तपासणी करावी आणि यंत्रे निवडणुकीसाठी सज्ज ठेवावीत. यंत्रांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना, मतदान केंद्रांच्या इमारतींची स्थिती आणि सुविधांची तपासणी आतापासूनच करावी. मनुष्यबळाची कमतरता टाळण्यासाठी वेळोवेळी आढावा घेऊन विभागीय आयुक्तांशी समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले. राज्य निवडणूक आयोग निवडणुकांसाठी पुरेशी मतदान यंत्रे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, जेणेकरून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल.