नवी दिल्ली : बिहार निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. काही वेळात निकाल हाती येणार आहेत. सोबतच मध्यप्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांचा निकाल देखील आज घोषित होत आहे. या निकालांचे कल हाती आले आहेत. बिहारमध्ये एनडीएने आघाडी घेतली आहे तर मध्यप्रदेशातही भाजपने मुसंडी मारली आहे. या धामधुमीत निवडणूक आयोग आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मागील 15 वर्षांपासून नितीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत.
कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.
ताज्या आकडेवारीनुसार आरजेडी, काँग्रेस महागठबंधन 112 जागांवर आघाडीवर तर भाजप आणि जेडीयू एनडीए 122 जागांवर आघाडीवर आहे. महागठबंधनमध्ये आरजेडी 91, काँग्रेस 22 आणि लेफ्ट 11 जागांवर तर एनडीएमध्ये भाजप 55, जेडीयू 49, हम दोन जागांवर आघाडीवर आहेत.