प्रभात वृत्तसेवा मंचर – राज्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीत घरपोच मतदानाची सुविधा गायब झाली आहे. ज्येष्ठ नागरिक-दिव्यांगांमध्ये नाराजी पसरली असून मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मोठी दिलासा देणारी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.निवडणूक विभागाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतदान करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला होता. यामुळे ज्यांना वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळून राहावे लागते, चालणे-फिरणे कठीण आहे किंवा जे दृष्टिदोषामुळे मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत, अशा अनेकांना प्रथमच मतदानाचा हक्क सहजपणे बजावता आला. परिणामी मतदानाचा टक्का लक्षणीय वाढल्याचे अनुभव आले. मात्र, यंदाच्या नगरपंचायत-नगरपरिषद निवडणुकीत अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करून न देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने मोठी नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी केंद्रावर जाणे अत्यंत कठीण आहे.त्यांच्याकडे स्वतः जाण्याची शारीरिक क्षमता नसल्याने, घरातून बाहेर निघणे धोकादायक ठरण्याची परिस्थिती आहे. अशा वेळेस घरपोच मतदानाच्या सुविधेचा अभाव त्यांच्या मतदानाधिकारावर थेट गदा आणणारा ठरत आहे. निवडणुकीची प्रक्रिया स्थानिक स्तरावर सुरू असली तरी अशा महत्त्वाच्या सोयीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये सुविधा देऊन त्याचे सकारात्मक परिणाम दिसूनही, नगरपंचायत निवडणुकीतच ती सुविधा न देण्यामागचे कारण अनेकांना समजत नाही. टक्का घसरण्याची भीती या बदलामुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची दाट शक्यता असल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींनी निवडणूक आयोगाकडे घरपोच मतदानाची सोय तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा त्यांच्या मूलभूत मतदानाच्या अधिकारापासून ते वंचित राहतील.अशी भीती व्यक्त केली जात आहे.