Trinamool Congress : निवडणूक आयोगाने अखेर त्रुटी मान्य केली; तृणमूल कॉंग्रेसने दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली : बनावट मतदार ओळखपत्र क्रमांकांच्या समस्येचे निराकरण 3 महिन्यांत करण्याची ग्वाही केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिली. त्यानंतर आयोगाने अखेर त्रुटी मान्य केल्याची प्रतिक्रिया तृणमूल कॉंग्रेसकडून देण्यात आली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूलने विविध राज्यांतील बनावट मतदार ओळखपत्र क्रमांकांचा मुद्दा उपस्थित केला होता.
आता अनेक वर्षांपासूनची ती समस्या दूर करण्याच्या उद्देशातून पाऊले उचलण्याचे सूतोवाच निवडणूक आयोगाकडून करण्यात आले. त्या घडामोडीवर तृणमूलचे खासदार साकेत गोखले यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक मतदारांना डुप्लिकेट नंबर्स देण्यात आल्याचे अखेर आयोगाने कबूल केले. ममतांनी ती बाब चव्हाट्यावर आणल्यानंतर ते घडले.
संबंधित त्रुटी वर्ष 2000 पासून घडत असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्रुटी दूर करण्यासाठी 25 वर्षे काहीच का केले गेले नाही? सध्या किती डुप्लिकेट नबंर्स आहेत ते का स्पष्ट करण्यात आले नाही, असे सवाल त्यांनी केले. मतदारयाद्यांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप नुकताच ममतांनी केला. त्या याद्यांच्या पडताळणीची प्रक्रियाही तृणमूलने हाती घेतली आहे.





