धर्माच्या नावावर मते मागणं भाजप खासदाराला पडले महागात; निवडणूक आयोगाने केली कारवाई, FIR दाखल

Lok Sabha Election 2024: बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. धर्माच्या नावावर मत मागितल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने (EC) तेजस्वी सूर्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी धर्माच्या आधारावर मते मागितली होती. (Fir Against Bjp Mp Tejasvi Surya)
कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी एक्स वर पोस्ट करुन सांगितले की, “एक्स हॅंडलवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला त्यात धर्माच्या आधारावर मते मागण्यात आली. त्याप्रकरणी खासदार आणि बेंगळुरू दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार तेजस्वी सूर्या यांच्या विरोधात कलम 123(3) अंतर्ग गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
Case is booked against Tejasvi Surya MP and Candidate of Bengaluru South PC on 25.04.24 at Jayanagar PS u/s 123(3) for posting a video in X handle and soliciting votes on the ground of religion.
— Chief Electoral Officer, Karnataka (@ceo_karnataka) April 26, 2024
तेजस्वी सूर्या यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये त्यांनी सीमा सुरक्षा, कलम 370 तसेच राम मंदिराचा उल्लेख केला आणि लोकांना मतदानाच्या शेवटच्या 4 तासांचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अडचणीचा ठरला.
अशा पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन केले –
यापूर्वी त्यांनी भाजप आणि काँग्रेसच्या मतदारांमध्ये 80-20 चा फरक असल्याचा अजब दावाही केला होता. ते म्हणाले होते की, “भाजपच्या मतदारांची संख्या 80 टक्के आहे, परंतु त्यापैकी फक्त 20 टक्केच मतदानासाठी बाहेर पडतात. त्याचवेळी काँग्रेसकडे 20 टक्के मतदार असले तरी त्यातील 80 टक्के मतदार मतदानासाठी येतात. हे बहुतांशी मतदान केंद्राचे ग्राउंड रिॲलिटी असल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रत्येक मत खूप महत्वाचे आहे. तुम्ही मतदान करा किंवा न करा, काँग्रेसचे 20 टक्के लोक मतदान करत आहेत.”
बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसने सूर्या यांच्याविरोधात सौम्या रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज कर्नाटकातील 14 जागांवर मतदान होत आहे. बेंगळुरू दक्षिण मतदारसंघातही आज मतदान प्रक्रिया पार पडली.
बेंगळुरू दक्षिण हा भाजपचा बालेकिल्ला आहे, 1991 पासून पक्षाचा येथून पराभव झालेला नाही. दिवंगत अनंत कुमार या जागेवरून 6 वेळा लोकसभेवर निवडून आले होते. 2019 मध्ये, विद्यमान भाजप खासदार तेजश्वी सूर्या यांनी काँग्रेसच्या बीके हरिप्रसाद यांच्यावर 27.87 टक्क्यांच्या फरकाने विजय मिळवला आणि लोकसभेतील सर्वात तरुण भाजप खासदार बनले.
2014 मध्ये ही जागा भाजपच्या अनंत कुमार यांनी काँग्रेसच्या नंदन नीलेकणी यांचा मोठ्या फरकाने जिंकून जिंकली होती. आजच्या सुरुवातीला, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी बेंगळुरूमधील बीईएस मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांची पत्नी, राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनीही आज बेंगळुरूमध्ये मतदान केले. सुधा मूर्ती यांनी लोकांना, विशेषतः तरुणांनी मतदानाचा हक्क बजावून आपला नेता निवडण्याचे आवाहन केले.





