Nagarparishad-Nagarpanchayat Election 2025 | राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार आजपासून (१० नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. मात्र महायुती आणि महा विकास आघाडीसारख्या प्रमुख आघाड्यांमध्ये राज्य पातळीवर काय चर्चा झालेली आहे, हे समोर आलेले नाही. यामुळे अनेक ठिकाणी पक्षीय चिन्हावर निवडणुका न लढवता स्थानिक आघाड्यांवर जोर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निवडणुकींमध्ये २८८ अध्यक्ष आणि ६,८५९ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. तर यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून १७ नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. १८ नोव्हेंबरला अर्जांची छाननी करण्यात येणार तर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. राज्यातील २४७ नगरपरिषदेपैकी ३३ पदे अनुसूचित जातींसाठी व ११ पदे अनुसूचित जमातीसाठी आणि ६७ पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर १३६ पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात निवडणुकीसाठी 6 लाख 34 हजार 940 मतदार पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी दि.१ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार या निवडणुकीसाठी ६ लाख ३४ हजार ९४० मतदार आहेत. या १४ नगरपरिषदांपैकी बारामती ही अ वर्ग नगरपरिषद आहे. तर लोणावळा, दौंड, चाकण, तळेगाव दाभाडे व फुरसुंगी- उरळी देवाची या पाच नगरपरिषदा ब वर्गामध्ये आहेत, तर क वर्गामध्ये सासवड, जेजुरी, इंदापूर, शिरूर, जुन्नर, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर यांचा समावेश होतो. मंचर, वडगाव मावळ आणि माळेगाव बुद्रुक यांचा समावेश नगरपंचायतींमध्ये होतो. या नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक एक वर्षांपूर्वी नव्याने अस्तित्वात आलेल्या फुरसुंगी- उरळी देवाची नगरपरिषदेसह मंचर आणि माळेगाव या नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे. फुरसुंगी- उरळी देवाची नगरपालिकेसाठी द्विसदस्य पद्धतीने निवडणूक होणार असून, एकूण प्रभाग संख्या ही १६ असणार आहे, तर ३२ नगरसेवकांची संख्या असणार आहे. या निवडणुकीतून नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी थेट निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. हेही वाचा : Farmer Suicide : कर्जास कंटाळून नगर तालुक्यात युवा शेतकऱ्याची आत्महत्या