पुणे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 (गट ड) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय प्रकाश ढेरे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक मानकर यांच्या उपस्थितीत भव्य व प्रभावी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिकांचा, कार्यकर्त्यांचा व पक्ष पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर प्रचार रॅलीची सुरुवात गंज पेठेतून झाली. संपूर्ण परिसर राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे, बॅनर, पोस्टर्स आणि घोषणांनी दुमदुमून गेला होता. “घड्याळाला साथ द्या, विकासाला मत द्या” अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले होते. या वेळी दीपक मानकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, “विजय प्रकाश ढेरे हे सामान्य जनतेशी थेट जोडलेले नेतृत्व आहे. त्यांनी आजवर समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच युवक आणि महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्याची त्यांची स्पष्ट भूमिका आहे.” पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांचा उल्लेख केला. दीपक मानकर यांनी राज्य पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीचा आढावा घेत महापालिकेत सक्षम, पारदर्शक आणि जनतेसाठी काम करणारे प्रतिनिधी निवडणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. “विकासाला गती देण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विजय ढेरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,” असे आवाहन मतदारांना केले. उमेदवार विजय प्रकाश ढेरे यांनीही यावेळी नागरिकांशी संवाद साधत, प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक सेवा, पारदर्शक कारभार आणि सातत्यपूर्ण विकास हाच आपला ध्यास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रचार रॅलीमध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण रॅली शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या भव्य प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून निवडणूक प्रचार अधिक जोमाने सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावेळी गणेश कल्याणकर, मिलिंद काची यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.