Jamkhed News : नान्नजमध्ये कोल्ह्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी; उपचारासाठी नातेवाईकांची धावपळ
Jamkhed News : यावेळी गावातील कुत्र्यांनी कोल्ह्याचा जोरदार पाठलाग केल्याने तो चांभार गल्लीतून पुन्हा शेताच्या दिशेने पळून गेला. या घटनेची चर्चा रात्रभर गावात पसरली होती.

जामखेड : जामखेड तालुक्यातील नान्नज येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये राहणारे युसुफ छट्टुमिया कुरेशी (वय ७०) यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी अचानक एका कोल्ह्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे गावात तीव्र घबराट पसरली असून, जखमी वृद्धेच्या उपचारासाठी नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, युसुफ कुरेशी हे शुक्रवारी सायंकाळी आपल्या घराजवळ असताना अचानक आलेल्या कोल्ह्याने त्यांच्या हाताचा चावा घेतला. यावेळी गावातील कुत्र्यांनी कोल्ह्याचा जोरदार पाठलाग केल्याने तो चांभार गल्लीतून पुन्हा शेताच्या दिशेने पळून गेला. या घटनेची चर्चा रात्रभर गावात पसरली होती.
शनिवारी सकाळी जखमी कुरेशी यांना तातडीने नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर पुढील उपचारासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडलिक अवसरे यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. कोल्ह्यावरील आवश्यक लस जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच कर्जतच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेडचे वनपाल आर. एस. राठोड आणि सेवानिवृत्त वनमजूर ताहेरअली सय्यद यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत जखमीच्या उपचारासाठी मोलाची मदत केली.





