El Mencho killed : एल मेंचोच्या हत्येनंतर मेक्सिकोमध्ये उसळला हिंसाचार; बंदोबस्तासाठी 10 हजार सैनिक तैनात
मेक्सिकोतील कुख्यात ड्रग तस्कर एल मेंचोचा खात्मा (El Mencho killed) झाल्यानंतर मेक्सिकोच्या प्रमुख शहरांमध्ये हिंसाचार उसळला असून या हिंसाचारात आतापर्यंत डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे.

El Mencho killed : मेक्सिकोतील कुख्यात ड्रग तस्कर एल मेंचोचा खात्मा (El Mencho killed) झाल्यानंतर मेक्सिकोच्या प्रमुख शहरांमध्ये हिंसाचार उसळला असून या हिंसाचारात आतापर्यंत डझनभर लोकांचा मृत्यू झाला आहे. हा हिंसाचार रोखण्यासाठी मेक्सिको सरकारने तब्बल १० हजार सैनिक तैनात केले आहेत.
जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा म्होरक्या नेमेसिओ ओसेगुएरा उर्फ एल मेंचो हा सोमवारी जलिस्को प्रांतातील तापाल्पा शहरात मेक्सिको लष्कराच्या कारवाईत गंभीर जखमी झाला आणि नंतर मरण पावला होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कार्टेलमधील सदस्यांनी २० प्रांतांना जोडणारे महामार्ग बंद केले आणि शेकडो वाहने पेटवून दिली. अनेक उद्योगांच्या ठिकाणांनाही आग लावण्यात आली आहे.
एल मेंचोला पकडण्यासाठी लष्कराने घातलेल्या छाप्याच्यावेळी आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये सुरक्षा दलांचे किमान २७ सदस्य, ४६ संशयित गुन्हेगार आणि एक नागरिक ठार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जलिस्को प्रांतातील एका तुरुंगावर सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर हा तुरुंग फोडण्यात आला आणि २३ कैद्यांनी पलायन केले, असे प्रांताच्या सुरक्षा सचिवालयाने म्हटले आहे.
ड्रग कार्टेलच्या सदस्यांनी हल्ला चढवल्याने घाबरलेले रहिवासी घरांमध्ये लपून बसले आणि पर्यटकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये आश्रय घेतला. मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे वृत्त मिळत असल्याने सोमवारपासून बहुतेक बाजारपेठा बंदच आहेत. सरकारने जलिस्कोमध्ये २,५०० सैनिकांची अतिरिक्त कुमक पाठवून दिली आहे. यामुळे या प्रांतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये तैनात करण्यात आलेल्या सैनिकांची एकूण संख्या १० हजार झाली आहे.
एल मेंचोचे जन्मस्थान असलेल्या मिचोआकन राज्यातील अगुइलिला येथे सोमवारी पहाटेपर्यंत नाकाबंदी होती, असे रहिवाशांनी सांगितले. जलिस्कोची राजधानी ग्वाडालजारामध्ये शाळा बंद राहिल्या आणि बहुतेक सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली. नागरिकांना खाद्यपदार्तांचा साठा करून ठेवता यावा, यासाठी किरकोळ विक्रीची दुकाने सुरू ठेवली गेली होती. या दुकानांबाहेर लोकांनी लांब रांगा लावल्याचे दिसत होते.
अमेरिका, कॅनडाकडून सतर्कतेचा इशारा
या घटनेनंतर ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिकेकडून प्रवासाचे इशारे जारी करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाने नागरिकांना काही प्रमाणात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका आणि कॅनडातून मेक्सिकोमध्ये जाणाऱ्या डझनभर विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली.





