मुंबई : आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी कधीही धुतली नाही, अशी टिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, कोविड असो किंवा मिठी नदी, प्रत्येक ठिकाणी यांनी दरोडा घातला आहे. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रहमान डकैत आहेत, तर आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर आहोत, असा शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. मुंबईची तिजोरी लुटणाऱ्या रहमान डकैताना पाणी पाजणारी ही धुरंधर महायुती आहे. शिंदे पुढे म्हणाले, माझे नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस सुरू होत नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि उपमुख्यमंत्री आहे तर आताही मला घटनाबाह्य म्हणतात. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकराला परत आणण्याचे काम आम्ही करू. सूर्य चंद्र आले, कुणाच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. झोपडी धारकांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम करतोय, असे शिंदे म्हणाले. यापुढे समुद्रात काळे पाणी सोडले जाणार नाही. मुंबईतील राजकीय प्रदूषणही दूर करू. वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडला मान्यता मिळाली आहे. बिकेसी ते नवी मुंबई विमानतळ भुयारी भोगदा करत आहोत. विरार ते वाढवणपर्यंत आपण रस्ते करतोय, अशी माहिती शिंदे यांनी दिली. आम्ही खुर्चीसाठी काम करत नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच होतो, आता ही तसाच आहे. मी कुठेही गेलो तरी अनेकांना प्रॉब्लेम आहे. मी टीकेला टीकेने नाही तर कामाने उत्तर देतो. तुम्ही म्हणाला होता लाडकी बहीण योजना बंद होईल, पण ती योजना अजूनही सुरू आहे. जे कोर्टात गेले ते हरले. कोणी आला तरी लाडक्या बहिणीची ओवाळणी बंद होणार नाही. त्यांना 2100 रुपये देणार आहोतच, असेही शिंदे म्हणाले.