अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतराचा सपाटा सुरू आहे. महायुतीतील घटक पक्ष असूनही अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या युवती आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा चंचल पितांबरवाले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षाचे उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऐन अकोट नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश घडला असून, यामुळे भाजपची संघटनात्मक ताकद कमजोर झाल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कथित मनमानीला कंटाळून चंचल पितांबरवाले यांच्यासह अनेकांनी भाजपला रामराम ठोकला होता. आता शिंदे सेनेत प्रवेश करून त्यांनी धनुष्यबाण चिन्ह हाती घेतले. चंचल पितांबरवाले यांचे अकोट आणि जिल्ह्यातील राजकारण तसेच समाजकारणात मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या जोडला शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत आल्याने शिंदे गटाला अकोल्यात मोठे बळ मिळाले आहे. भाजपसाठी हा सलग धक्का मानला जात असून, महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. येत्या निवडणुकांत याचा परिणाम दिसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.