पिंपरी – पदाधिकाऱ्यांच्या निवडीला होत असलेला उशिर, पुण्यातील पोटनिवडणुकीतील पराभवाने कार्यकर्त्यांमधील मावळलेला उत्साह, तसेच मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग, पक्षातील पदाधिकाऱ्यांची दुटप्पी भुमिका यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बॅकफुटवरच गेल्याचे चित्र आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे धनुष्य पेलविण्याचा प्रयत्न करत असतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने आढळरावांचाही हिरमोड झाल्याने शिंदे यांच्या शिवसेनेसमोरील अडचणीत भरच पडली आहे.
शिरूर लोकसभा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना तीन वेळा मतदारांनी संसदेत पाठविले होते. मात्र, 2019 मध्ये या बालेकिल्ल्याला खिंडार पडले. अभिनेता म्हणून लोकप्रिय ठरलेल्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरविले आणि त्यांनी शिरूरचे मैदान मारले. त्यामुळे शिवसेनेला हा पहिला धक्का मानला जात होता. यानंतरही शिवाजीराव आढळराव यांनी मैदानात तग धरून शिवसेनेची ताकद कायम ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यानच्या काळात राज्यातील शिवसेनेत उभी फूट पडल्याने सोयीची भूमिका घेत माजी खासदार आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यांच्यासोबत बहुतांश नेतेमंडळी जातील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, तो अंदाज फोल ठरला आहे. भोसरी विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप उघड भूमिकाच घेतली नसल्याने ते शिंदे की ठाकरे यांच्यासोबत हे अद्यापही स्पष्ट न झाल्याने आढळरावांची मोठी अडचण भोसरीत झाली आहे.
त्यामध्येच उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या भावनिक लाटेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीरपणे कोणीही वावरताना दिसत नाही. पक्षफुटीनंतर नव्याने पदाधिकारी जाहीर केले जात होते. शिरूर लोकसभेत मात्र पदाधिकाऱ्यांच्या निवडीची गती आणि त्याची प्रसिद्धी देखील संथ गतीनेच होताना दिसत आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत जाणवेलच. मात्र, सध्या तरी ठाकरेंच्या शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक, राष्ट्रवादीचे वाढते मतदार, शिवसेना फुटीने वाढलेली नाराजी यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना बॅकफुटवरच असल्याचे चित्र शिरूर लोकसभेत आहे.
मतदारसंघाची बांधणी अडचणीची
शिरुर लोकसभा हा क्षेत्राफळाच्या दृष्टीने मोठा आहे. त्यातच ग्रामीण आणि शहरी मतदारांचा सहभाग अशी या मतदारसंघाची रचना आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी आणि पुण्यातील हडपसर या शहरी भागाचा या मतदारसंघात समावेश आहे. उद्धव ठाकरे यांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून अद्यापपर्यंत कोणीच उघड विरोध केलेला नाही. राजकीय भवितव्य सुकर करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी कट्टर शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातही उद्धव ठाकरे यांनाच मिळणारी साथ पाहता आढळरावांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनची मतदारसंघात नव्याने बांधणी अडचणीची ठरत आहे. अधून-मधून भाजपकडून सांगितला जाणारा दावा, खासदार अमोल कोल्हे यांची भाजपशी वाढती जवळीक आणि पुण्यातील पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव या बाबी आढळरावांसाठी अडचणीच्या ठरू लागल्या आहेत.
राष्ट्रवादीचा प्रभाव
शिरुर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव आहे. या मतदारसंघात सहा विधानसभेचा समावेश होतो. त्या पैकी भोसरी वगळता जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचा वाढता प्रभावही मुख्यमंत्री शिंदेंच्या सेनेला अडचणीचा ठरत आहे.
भाजपाच्या दाव्याने अडचणी
सध्या राज्यात भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना सत्तेत आहेत. दोन्ही पक्षांची आघाडी असतनाही शिरूर लोकसभा लढवून जागा जिंकण्याबाबतचे आवाहन भाजपाने केले आहे. त्यामुळे आगामी काळात उमेदवारीवरून दोन्ही पक्षात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ भाजपासाठी सोडल्यास माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नाराजी वाढेल. त्याचा फटका मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.