एकनाथ शिंदेंचे गुरूपौर्णिमेला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन; ट्वीट करत म्हणाले “बाळासाहेबांच्या विचारांशी….”

मुंबई : आज देशभरात गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त खास ट्वीट केले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना त्यांनी या ट्विटच्या माध्यमांतून अभिवादन केले आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपण त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असे सांगत अप्रत्यक्षपणे आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो असून बाजूला “बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन,” असे लिहिण्यात आले आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांसहित एकनाथ शिंदेंवर सतत टीका होत आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे आपण बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा युक्तिवाद करत आहेत.





