मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईत एकनाथ शिंदेंची रणनीती यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. कारण, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपशी जागावाटपाच्या वाटाघाटी कशा करायच्या, असा प्रश्न शिंदेसेनेसमोर होता. मात्र 227 पैकी तब्बल 90 जागांपर्यंत मजल मारण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आले आहे. तर युतीमध्ये 227 पैकी सर्वाधिक 137 जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. मुंबईत महायुतीतील शिवसेना आणि भाजप हे दोन मोठे पक्ष एकत्र लढणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर चर्चेवेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र मागील निवडणुकीत एकत्र शिवसेनेचे 84 नगरसेवक असूनही, केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याने, शिंदेंची शिवसेना काहीशी नाराज होती. शिंदेंच्या बंडानंतर 39 नगरसेवकांनी त्यांना साथ दिली होती. तर इतर पक्षातील 21 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे 60 नगरसेवक होते. या सर्वांना तिकीट देण्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होतेच, पण पूर्वीच्या 84 जागा ज्या मागील निवडणुकीत एकत्र शिवसेनेने जिंकल्या होत्या, त्या जागाही आपल्याकडे ठेवण्यासाठी शिंदेंनी यशस्वी वाटाघाटी केल्या. यातील काही जागांची आदलाबदल झाली. मात्र त्यापुढे जाऊन एकनाथ शिंदेंनी 90 जागांपर्यंत मजल मारली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-शिवसेनेत फूट भाजप आणि शिंदेसेना छत्रपती संभाजीनगर निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहेत. कारण दोन्ही पक्षांमधील जागावाटपाची चर्चा फिस्कटली आहे. सत्ताधारी महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या दोन्ही पक्षांचे नेते आता या फुटीबद्दल एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दावा केला की, या ठीकाणी वाढत्या ताकदीमुळे आलेल्या अहंकारामुळे भाजपने युती तोडली आहे.