एकनाथ शिंदेंचे विश्वासू मंगेश चिवटे यांच्यावर मोठी जबाबदारी! या मतदार संघासाठी शिंदेसेना आग्रही, भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

Mangesh Chivte : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची जबाबदारी शिंदेंचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या मंगेश चिवटे यांच्यावर सोपविण्यात आली होती. मंगेश चिवटे हे या पदावर कार्यरत असताना त्यांनी अनेक रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारांसाठी लागणारा खर्च मिळवून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी डॉ. रामेश्वर नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. दिवाळीनंतर या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे आता इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली जात आहे. या सगळ्या वातावरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांच्यावर मोठी जबाबदारी शिवसेना पक्षाच्या वतीने सोपविण्यात आली आहे.
मंगेश चिवटे यांची पुणे शिक्षक मंतदार नोंदणी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि खासदार नरेश मस्के यांनी काढले आहे. चिवटे यांच्यावर पुणे शिक्षक मतदारसंघातील मतदारांची नोंदणी करणे आणि या विभागातून शिवसेनेचा उमेदवार जास्त मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मंगेश चिवटे यांच्या पुणे शिक्षक मतदारसंघात गाठीभेट वाढल्या आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघ भाजपने घ्यावा आणि पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी चर्चा आहे. त्यातच शिवसेनेच्या काही बड्या मंत्र्यांनी मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याची विधाने केली आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सहकाऱ्याची निवड पुणे शिक्षक मतदार संघाच्या नोंदणी प्रमुखपदी केल्याने आगामी निवडणुकीत शिवसेनेकडून पुणे शिक्षक पदवीधर मतदार संघावर दावा जवळपास निश्चित मानला जात आहे. परंतु, याबाबत भाजपची भूमिका काय आहे, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : Pune : नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांसाठी ३० कोटींचा अतिरिक्त निधी





