मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रशाससकीय कामकाजातील वाढत्या हस्तक्षेपाला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक नवा निर्णय घेतला आहे. त्यांनी अजित पवारांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांच्या फायलींसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांना झटका दिला आहे. त्यानुसार, अजित पवारांकडून येणारी फाइल सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. त्यानंतर त्या अंतिम मंजूरीसाठी मुख्यंमत्री शिंदेंच्या टेबलावर पोहोचतील. परंतू त्यापूर्वी, या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या फायलींवर स्वाक्षरी करणे आवश्यक असेल. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून बैठकांचा धडाका लावला आहे. ते वेगवेगळ्या विभागाच्या बैठका घेत आहेत. यामुळे ते मुख्यमंत्री शिंदेंच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी पवारांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी त्यांच्याकडून येणाऱ्या सर्व फायलींचा प्रवास व्हाया उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून करण्याचे निर्देश दिले असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाद्वारे अजित पवार यांच्या वाढत्या हस्तक्षेपाला निर्बंध घातल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, पुण्याच्या पालकमंत्रिपदावरूही भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील व अजित पवार यांच्यात संघर्ष असल्याची चर्चा आहे.