मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासादायक निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळुरू आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. यासाठी ‘गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन’ नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून, त्यावर वाहन क्रमांक आणि मालकाची माहिती नोंदवली जाईल. हे पास प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील आणि परतीच्या प्रवासासाठीही वैध राहतील. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाला पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा देण्याचे आणि याबाबत जाहिरात व सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भक्तांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहतुकीवर निर्बंध गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या जड वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 अंतर्गत प्रवेश बंदी असेल. यामध्ये अवजड वाहने, ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर, लॉरी आदींचा समावेश आहे. ही बंदी गणेशमूर्तींचे आगमन, गौरी-गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी लागू राहील. हा निर्णय गणेशभक्तांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी घेण्यात आला आहे. जड वाहतुकीवरील बंदी खालील कालावधीत लागू असेल 23 ऑगस्ट (मध्यरात्री 12) ते 28 ऑगस्ट (रात्री 11) – गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी. 31 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर (सकाळी 8 ते रात्री 11) – 5 आणि 7 दिवसांच्या गणपती विसर्जन, गौरी-गणपती विसर्जन आणि परतीच्या प्रवासासाठी. 6 सप्टेंबर (सकाळी 8) ते 7 सप्टेंबर (रात्री 8) – अनंत चतुर्दशीसाठी 11 दिवसांचे गणपती विसर्जन आणि परतीचा प्रवास.