Eknath Shinde : काल एकनाथ शिंदेंनी डाव टाकला ! अन् आज आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसला थेट ताकद दाखवली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत भाकरी फिरवत राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत भाकरी फिरवत राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये नवीन उत्साह संचारला आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी रायगडमध्ये माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (तटकरे गट) ला थेट इशारा दिला आहे.
दळवी म्हणाले, “कोकणात सर्वात मोठा पक्ष शिवसेना आहे. आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीत जे काही घडले ते आम्ही स्वीकारले, पण आता जागावाटपात आमचा दुसरा नंबर लागेल. आम्हाला योग्य स्थान मिळाले नाही तर आम्हाला गिअर बदलावे लागेल. तशी ताकद आमच्याकडे आहे.”
जिल्हा परिषद निवडणुकीतील खदखद बाहेर
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यात महायुतीत फूट पडली होती. काही ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपशी तर काही ठिकाणी ठाकरे गटाशी युती केली होती. शिवसेनेला बाजूला ठेवण्याची खेळी खेळली गेली.
निकालात मात्र शिवसेनेने २१ जागा, राष्ट्रवादीने १६ जागा आणि भाजपने १५ जागा जिंकल्या होत्या. सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेनेची कोंडी झाली. शेवटी मुंबईत झालेल्या चर्चेनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपने घेतले तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीने. यामुळे शिवसेना नेत्यांच्या मनात खदखद निर्माण झाली होती, जी आता आमदार महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यामुळे उघड झाली आहे.
अशोक खरात प्रकरणावरही टीका
दळवी यांनी अशोक खरात प्रकरणावरही तीव्र भाष्य केले. ते म्हणाले, “ज्यांनी जे केले त्यांना भोगावे लागणार आहे. अशोक खरातने महिलांवर अन्याय केला आहे. खरातला पाठिंबा देणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे.”
पुढील काळात रायगडमध्ये तीव्र संघर्ष?
आमदार महेंद्र दळवी यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी (तटकरे गट) असा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कप्रमुख नियुक्तीनंतर शिवसेना आता अधिक आक्रमक होत असल्याचे दिसत आहे.






