मुंबई – पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्राच्या 6 जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरात पर्यटनासाठी गेलेले शेकडो मराठी नागरीक अडकून पडले आहेत. सरकारने हे सर्वजण सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. पण आता या प्रकरणी समन्वय साधण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकामी समन्वय साधण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांना जातीने श्रीनगरला पाठवले आहे. ते तिथे अडकलेल्या मराठी पर्यटकांशी सुसंवाद साधून त्यांना परत आणण्यासंबंधी योग्य ती उपाययोजना करणार आहेत. या हल्ल्यात ठार झालेल्या महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचे मृतदेह आजच परत आणले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः जम्मू काश्मीरला जाऊन स्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांनी या प्रकरणी श्रीनगर येथे अडकून पडलेल्या कुलकर्णी कुटुंबाशी संवाद साधला. खासदार श्रीकांत शिंदे यांचे स्विय सहाय्यक अभिजीत दरेकर यांच्या माध्यमातून फोनवरून झालेल्या या संवादात शिंदे यांनी पीडित कुटुंबाला सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. कुलकर्णी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून शिंदे यांच्याकडे मदतीची याचना केली होती. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ दरेकरांना त्यांच्याकडे पाठवून त्यांना दिलासा दिला होता. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तत्काळ योग्य ती मदत करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित घरापर्यंत पोहोचवणे व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देणे याला आमच्या सरकारचे प्राधान्य असल्याचे ते म्हणालेत.