ठाणे : भाजपसोबतची शिवसेनेची युती सत्तेसाठी नसून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी करण्यात आली आहे, असे ठाम मत उपमुख्यमंत्री व शिवसेने नेते एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले. ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती दणदणीत विजय मिळवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप-शिवसेना युती ही निस्वार्थ आहे. काही लोक केवळ सत्तेसाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी युती करतात, मात्र आमची युती जनतेच्या कल्याणासाठी आणि राज्याच्या विकासासाठी आहे, असे सांगत त्यांनी विरोधी पक्षांच्या आघाड्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. राज्यातील राजकीय नेत्यांना कोणाशी आणि कोणत्या कारणासाठी युती करायची याचा पुरेसा अनुभव आहे, असेही शिंदे म्हणाले. शिंदे यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवरच पुढे जात आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करत आहोत. ज्यांनी त्यांच्या विचारांचा विपर्यास केला, त्यांना जनतेनेच बाजूला केले. महायुती आगामी निवडणूका या विचारसरणी आणि विकास या दुहेरी मुद्द्यांवर लढवेल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.