Eknath shinde | राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. यात महायुतीला मोठा विजय मिळाला असल्याचे पाहायला मिळाले आहे. महायुतीच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील मतदारांचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. सुरवातीच्या कलानुसार महायुती तब्बल २०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर, महाविकास आघाडीची मोठी निराशा झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी म्हंटले की, महायुतीला मोठे यश मिळाले आहे, त्यासाठी मतदारांचे सर्वप्रथम आभार मानतो. हा डोंगराएवढा विजय आहे. लाडक्या बहिणींनी मतदान केले, लाडके भाऊ, लाडके शेतकऱ्यांनी आम्हाला भरभरून मतदान केले. गेले दोन वर्षे जे आम्ही काम केले, त्याची पावती आम्हाला मिळाली आहे. जे काम केले त्याचे पोचपावती जनतेने आम्हाला दिली आहे. पुढील काळात आमची आणखी जबाबदारी वाढली आहे. सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो.” मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘निकालाची सगळी आकडेवारी समोर आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून पुढील निर्णय घेऊ. ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री असं काही आमच्यात ठरलेलं नाही. ज्या पद्धतीनं आम्ही एकत्र निवडणूक लढलो, त्याच पद्धतीनं पुढचा निर्णय घेऊ, असं शिंदे म्हणाले. दरम्यान, भाजप सर्वांत मोठा पक्ष होत असल्याचे दिसत आहे. सुरवातीच्या कलानुसार दुपारी बारापर्यंत २८८ पेकी महायुती २२१ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी ५० जागी आघाडीवर आहे. आतापर्यंत कोणाला किती जागा मिळाल्या? महायुतीत भाजप १२७, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ३८ हे पक्ष सध्या एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. तर, महाविकास आघाडी ५० जागांवर आघाडीवर असून, यामध्ये काँग्रेस १८, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १५ जागांवर आघाडीवर आहे.