ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे प्रमुख नेते अक्षय ठाकूर यांनी घरवापसी करत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अक्षय ठाकूर यांनी आज पक्षप्रवेश केला. ते आता कळवा प्रभाग क्रमांक २४ मधून महापालिका निवडणूक लढवणार आहेत. हा प्रवेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे, कारण ठाणे हे शिंदे यांचे मजबूत गड आहे. जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल प्रवेश सोहळ्यात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना शिंदे गटावर ताशेरे ओढले. ठाणे महापालिकेवर पडलेला दरोडा थांबवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. त्यांनी पुढे म्हटलं की, काँग्रेसचे नेते विक्रांत चव्हाण यांच्याशी बोलणार असून, काही वाद असतील तर मिटवण्याचा प्रयत्न करू. उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होणार आहेत, असंही आव्हाड यांनी सांगितलं. कैलास शिंदे यांचे पक्षाला पत्र कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी पक्षाच्या नेतृत्वाला पत्र लिहून पक्षातून स्वतःची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडक टीका केली आहे. “आज निष्ठेला किंमत राहिलेली नाही, आर्थिक क्षमता हाच एकमेव निकष बनला आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मनोज गणपत चौधरी यांचा राजीनामा दुसरीकडे, कल्याण ग्रामीण भागातील शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आणि परिवहन समितीचे माजी सभापती मनोज गणपत चौधरी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सांगितले की, २०१८ पासून आपण निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होतो आणि पक्षाकडून संधी आणि योग्य सन्मान मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, भाजपशी युती झाल्यानंतर आपल्याला डावलले जाईल, अशी शंका निर्माण झाल्याने त्यांनी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे.