उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी, शिवसेनेच्या बैठकीत ठराव

Uddhav Thackeray: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे आहेत. मात्र, आता त्यांना अध्यक्षपदावरून हटवावे अशी मागणी करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंना अध्यक्षपदावरुन हटवावे, असा ठराव शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
शिवसेनेची मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीचे अध्यक्षपदावरून हटवण्यात यावे, असा ठराव करण्यात आला आहे. तसेच, हा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली आहे.
या बैठकीनंतर बोलताना रामदास कदम म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. शिवसेनेच्या विचारधारेला काळीमा फासण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला हरताळ फासली, लाचारी पत्करून उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले. त्या उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा अजिबात अधिकार नसल्याचे ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ उद्धव ठाकरेंची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
मुंबईतील सर्व शाखाप्रमुख आणि सर्व पदे रिक्त करून नवीन नियुक्ती केल्या जाणार आहेत. 24 ते 29 जानेवारीपर्यंत सभासद नोंदणी केली जाईल. 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बीकेसीमध्ये भव्य मेळावा आयोजित केला जाणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.





