Eknath Shinde : ‘आज बाळासाहेब असते तर..’; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) च्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गट आणि विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आपल्या २०२२ मधील बंडखोरीचे समर्थन करताना शिंदे म्हणाले, “आम्ही जो निर्णय घेतला, तो योग्य होता. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीही आमच्या शिवसैनिकांची पाठ थोपटली असती.” या विधानातून त्यांनी उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला. यासोबतच, महापुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना (बळीराजाला) आधार देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर विशेष भर दिला. ते म्हणाले, “आज बळीराजा मोठ्या संकटात आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत, शेती वाहून गेली, जमीन खरडली गेली, पशूधन गमावले, घरांची पडझड झाली. मी स्वतः बांधावर गेलो, त्यांचे दुख डोळ्यांनी पाहिले. अशा वेळी आपण त्यांच्या पाठीशी उभे राहून मदतीचा हात द्यायला हवा.” शिंदे यांनी शिवसेनेच्या ‘जिथे संकट, तिथे शिवसेना’ या धोरणाचा पुनरुच्चार केला आणि आपत्तीच्या काळात शिवसैनिकांनी नेहमीच मदतीचे तोरण बांधल्याचा दावा केला.
महापुरामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
महापुरामुळे मराठवाडा आणि इतर भागांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगताना शिंदे म्हणाले, “बळीराजा कोलमडला आहे. अनेक वर्षांत इतका भयंकर पाऊस आणि संकट लोकांनी पाहिले नाही. सगळं उद्ध्वस्त झालंय. अशा परिस्थितीत सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे.” त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्याही अटी-शर्थी न ठेवता शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. “आम्ही सगळ्यांनी ठरवले की, बळीराजाला आधार द्यायलाच हवा. हे संकट मोठे आहे, पण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,” असे ते म्हणाले.
दसऱ्याच्या सावटाखालील मेळावा
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या मेळाव्यावर महापुराचे सावट असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. ते म्हणाले, “हा दसरा सण मोठा आहे, पण यंदा पुराच्या संकटाने त्यावर परिणाम झाला आहे. अशा वेळी आपला अन्नदाता, बळीराजा याच्या मागे उभे राहणे, हीच शिवसेनेची खरी शिकवण आहे.” मेळाव्यात उपस्थित असलेले शिवसैनिक आणि आजूबाजूचे नागरिक यांच्यासह अनेक शिवसैनिक पूरग्रस्त भागात मदतकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. “जिथे आपत्ती, तिथे शिवसेना धावून जाते. मी स्वतः, तुमचा एकनाथ शिंदे, संकटाच्या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले.





