कल्याण : महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वादाने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेमुळे निर्माण झालेल्या वादानंतर शिंदे गटाने (Eknath Shinde) शांतपणे आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. कल्याणमध्ये शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का देत शेकडो उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांना पक्षात सामावून घेतले आहे. यामुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे. कल्याणमधील पक्षप्रवेशाने खळबळ कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शहाड येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसमधील अनेक उत्तर भारतीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या जंबो भरतीने काँग्रेसला धक्का बसला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाने ‘हिंदी पट्टा’ मजबूत करण्याचा मनसुबा रचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे गटाचे मतांवर लक्ष्य मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसेने एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अलीकडेच वरळी डोम येथील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यातही शिंदे यांच्यावर मराठी भाषेच्या अवमानाचा आरोप करत हल्लाबोल करण्यात आला. मात्र, या टीकेला न जुमानता शिंदे गटाने उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मास्टरस्ट्रोक खेळला आहे. कल्याणमधील या पक्षप्रवेशाने शिंदे गटाने भाषिक वादाला बगल देत मतांची बेरीज वाढवण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. राजकीय समीकरणात बदलाची चिन्हे शिंदे गटाच्या या रणनीतीमुळे कल्याणसह राज्यभरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतीय मतदारांचा पाठिंबा मिळवून पक्षाला बळकटी देण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न स्पष्ट दिसत आहे. या घडामोडींमुळे स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.