Eknath Shinde : ‘विरोधकांच्या पोटदुखीवर एखादं झाड शोधतो!’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा मिश्किल टोला
गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या मुळगावी दरे येथे उपस्थिती लावली.

Eknath Shinde : गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या मुळगावी दरे येथे उपस्थिती लावली. दरे येथे आल्यानंतर शिंदे यांनी आपल्या शेतात विविध वृक्षांसह बांबूच्या रोपांची लागवड केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलत्या हवामानामुळे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पावसाचे प्रमाण कमी होणे तसेच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. हवामानातील हे बदल गांभीर्याने घेण्याची गरज असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे ही काळाची गरज आहे, असे शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बदलत्या हवामानाचा परिणाम जगभर जाणवत असल्याचे सांगताना शिंदे यांनी नेपाळमधील पूरस्थिती तसेच हिमनद्या वितळण्याच्या घटनांचा संदर्भ दिला. निसर्गाचा समतोल बिघडल्यास त्याचे परिणाम मानवी जीवनावरही होतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या त्यांच्या नाराजीच्या चर्चांबाबत विचारले असता शिंदे यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली. ‘मी गावी आलो तरी लोक नाराज होतात, दिल्लीला गेलो तरी चर्चा होते आणि लंडनला गेलो तरी चर्चा होते,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले.
आपण ज्या ठिकाणी जातो, ते कामासाठी जातो, असे सांगत त्यांनी इंग्लंड दौऱ्याचा संदर्भही दिला. महाराष्ट्राची भूमिका, राज्यातील विविध प्रकल्प, विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी या दौऱ्यात मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्याबाबत कोण काय बोलते किंवा कोणाला काय वाटते, याकडे आपण लक्ष देत नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. विरोधकांच्या ‘पोटदुखी, जळजळ आणि मळमळी’वर मिश्कील टोला लगावत, ‘त्यांच्यासाठीही एखादं झाड शोधतो,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुळगावी आलेल्या शिंदे (Eknath Shinde) यांनी वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला, तर त्यांच्या राजकीय नाराजीच्या चर्चेवरील मिश्कील प्रतिक्रियेमुळे दरे येथील त्यांचा मुक्काम चर्चेचा विषय ठरला.






