Eknath Shinde – मविआतील सगळे घटकपक्ष हे स्वार्थासाठी एकत्र आले होते. लोकसभेच्या निवडणुकीत लोकांची दिशाभूल करून, फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवली. आणि निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारांच्याच पाठीत खंजीर खुपसला. मग, विधानसभेला मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
वरळी येथे आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुरली देवरा यांच्या जयंतीनिमित्त राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी वरळीत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज कोणत्या लोकांना राजकीय चष्म्याची गरज आहे, हे तुम्हाला देखील माहीत आहे. त्यांनादेखील चष्मे देऊ, अशी टिप्पणी त्यांनी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सत्तेत असताना आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर खालच्या भाषेत टीका केली जात होती. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांना तुरुंगात टाकायचा प्रयत्न झाला, तेव्हा त्यांच्यावरही अत्यंत वाईट भाषेत टीका झाली. आता आपण काय बदल होतायत ते पाहतो आहोत. एवढ्या वेगाने रंग बदलणारे आपण पाहिले नाहीत, अशी टीका त्यांनी ठाकरेंचे नाव न घेता केली.
अडीच वर्षे महायुतीचे सरकार असताना, मी मुख्यमंत्री असताना मला दररोज शिव्या-शाप दिले, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना त्यांना तुरुंगात घालायचे कारस्थान केले. आणि आज आपण पाहतोय काय जादू झाली आहे ते. सरडे रंग बदलतात, पण एवढ्या फास्ट रंग बदलणारे आपण पाहिले नाही.
शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाकडून अनेक वैद्यकीय उपक्रम राबवले जातात, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडूनही अनेक असे उपक्रम राबवले जात असल्याचे सांगतानाच शिवसेना केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे काम वर्षभर सुरू असते, असा टोला देखील त्यांनी लगावला.