ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. शिवसेना महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हंटले आहे. एकनाथ शिंदेसाठी मोठा धक्का ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने तो शिवसेनेसाठी एक मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राजीनामा देण्यामागचे कारण? काही दिवसांपूर्वी पक्षविरोधी कारवाई केल्या प्रकरणी प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगर येथील शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते आहेत. शिवसेनेतून वायचळ यांची हकालपट्टी केल्यानंतर मीनाक्षी शिंदे नाराज होत्या आणि यातूनच त्यांनी आपला राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. आता त्या शिवसेना पक्षातून बाहेर पडून अन्य पक्षात प्रवेश करणार का? त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत? या सर्व पक्षांची उत्तरं सध्यातरी गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कोण आहेत मीनाक्षी शिंदे? मीनाक्षी शिंदे या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील) राजकारणी आहेत. त्या ठाणे महानगरपालिकेच्या माजी महापौर (२०१७ मध्ये निवड) आणि शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख होत्या. त्या २००७ ते २०१७ पर्यंत सलग तीन वेळा ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या. ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानले जाते आणि मीनाक्षी शिंदे या त्यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. २०२२ मध्ये शिवसेना फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला पाठिंबा दिला, त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. आजच त्यांनी शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.